सोमवार, ७ नोव्हेंबर, २०११

येता-येता....४


                                                                     सजावट 


सकाळी ऑफ़ीसला जाण्यासाठी गाडीला कीक मारली.पावसाने आता पुर्ण विश्रांती घेतली होती व सकाळी धुक्याचे साम्राज्य सुरु झाले होते. नेहमी प्रमाणे पेपर घेण्यासाठी थांबलो. स्टॉल मोकळा सोडून काका कुठेतरी बाजुला गेले होते सहज लक्ष समोरील बस स्टॉप कडे गेले. आपल्या उजव्या खांद्यावरील झोळीत असलेले लहान मुल त्याचे टक्कल असलेले डोके योग्य प्रमाणात बाहेर ठेवत त्या मुलाची रचना करत एक भिकारीण उभी होती. बहुतेक ते मुल झोपलेलेच असावे. तेव्हडे झाल्यावर तीने स्वतःच्या कपड्यांकडे नजर फीरवली. आपण बाहेर जाताना जसे कपडे ठीक-ठाक आहेत ना हे पाहतो तसे तीने आपले दारीद्र्य योग्य रीतीने दिसते आहे ना याची खात्री केली असावी. एव्हढ सगळ झाल्यावर डाव्या खांद्यावर आणखी एक झोळी लटकवत भिक मागण्यासाठी ती सज्ज झाली. तीची ती तयारी बघीतली नी मनात विचार आला भिक मागण्यासाठी आवश्यक अशी ती एक सजावट होती. तीच्याकडे बघुन कोणाला दया आली तरच तीला भिक मिळणार होती. काकांची वाट पाहुन पुन्हा गाडी सुरु केली व मनामध्ये विचार आला रोजच्या जीवनामध्ये आपण अशा अनेक सजावटी बघत असतो. आधी पोटोबाच्या न्यायाने डोळ्यासमोर पहीला आला आमचा भाजीवाला.

          वांगी,भेंडी, मुळा,सुरण, बीट, गाजर,मिरची, कोथींबीर ह्या सर्व भाज्यांची मांडणी अशी केलेली असते की त्याच्या स्टॉलकडे लक्ष जातेच.नीट एकमेकांवर ठेवलेल्या भाज्या,त्यांची रंगसंगती सर्व काही मन लावुन केलेले. सध्याच्या महागाइच्या काळात ४ पैकी १ वांग हमखास जुन्या शिल्लक मालातील तागडीत टाकूनही,घरची ओरड ऎकूनसुद्धा माझ्यासारखे अनेक जण हमखास तिथेच भाजी घेतात. 
फुटपाथवरील माल विक्रेते केवळ सजावट व मांडणीच्या जोरावर आपला माल खपवत असतात. 
                                              
          बुधवार आणी रविवारी हमखास भेट होते ती मित्राबरोबर अब्दुलच्या माश्यांच्या स्टॉलची. तो ज्या पद्धतीने वेगवेगळॆ मासे कडाप्प्यावर मांडून ठेवतो ते बघण्यासारखे असते. एव्हड्या मोठ्या ढीगातुन मित्राला साहेब  वेगळे ठेवले होते म्हणत पापलेट, सुरमई सहज काढून देतो.
                                                 

गेली अनेक वर्षे आणखी एका ठीकाणी मी हमखास जातो ते म्हणजे राजुची पानपट्टी. पूढे खाउच्या बरण्या, काचेच्या कपाटात नीटपणे मांडलेली सिगरेट्सची पाकीटे, एका बाजुला वेगवेगळ्या तंबाखुच्या डब्या, मसाला पान बनवण्यासाठीचे सर्व घटक एका ओळीमध्ये नुसते बघीतले तरी पान खावस वाटाव अशी रचना. बरेच वर्षांनी हल्ली त्याने मला सांगीतले की ह्यातली निम्मी पाकीटे व तंबाखुच्या डब्या रिकाम्याच असतात पण कपाटे भरलेली दिसल्याशिवाय गिऱ्हाइक येत नाहीत म्हणे.
            आजकाल कपड्यांच्या दुकानामध्ये वा शोरुममध्ये कपड्यांची मांडणी अश्या पद्धतीने केलेली असते आपण मोहात पडून खरेदी करतो. तिथे मॉडेलला घातलेले टि-शर्ट मी घातल्यावर चांगले दिसत नाहीत हे माहीत असूनही मी पुन्हा पुन्हा खरेदी करतोच.

            अशा अनेक गोष्टी केवळ सजावटीमुळे आपणाशी निगडीत असतात पण आमच्यासारखे नोकरी करणारेही रोज सजावट करत असतातच की! फक्त आमच्याजवळ मांडण्यासाठी असतात शब्द. घरी बायको बरोबर, रजा न मिळाल्यामुळे गावी येता येत नाही हे सांगताना आई-वडीलांबरोबर, सिग्नल चुकवल्यावर पोलीसांबरोबर, ऑफिसमध्ये बॉस बरोबर, मालकाबरोबर, कर्जाला जामिन रहा म्हणून सांगण्यासाठी मित्राबरोबर एक ना अनेक सजावटी करून आपणही रोज मार्ग काढतोच ना?







शुक्रवार, २१ ऑक्टोबर, २०११

` आनंदवन भुवनी' ......2



आनंदवन भुवनी!!!
गेले अनेक दिवस वाटायच आता सुरुवात करुया पण सुरुवात होत न्हवती हे मात्र खर, पण  महाराष्ट्र टाईम्सच्या पहिल्या पानावरील ‘घेतला वसा जपण्यासाठी ’ हे आनंदवन वरील लेख वाचला आणि विचारांच्या गर्दीला वाट मिळाली.
खरतर मी चंद्रपुरला गेलो होतो नाट्यस्पर्धेसाठी. महिना जुलै, संपुर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाने थैमान घातले असताना आम्ही संपुर्ण सेट घेउन ९०० कि.मी. नाटक करण्यासाठी आलो होतो. दि.१९ ला माझे नाटक सादर झाले. खर तर हे मी लिहिलेले दुसरे नाटक. आपली संहिता रंगमच्यावर सादर होताना प्रत्यक्ष पहाणे ही वेगळीच मजा असते. दुसरा दिवस मोकळा होता. आम्ही चौघानी आमचा प्रोग्रॅम निश्चित केला.चंद्रपुरला गेल्यावर दोन वने पाहिल्याशिवाय परत येउ नये. एक ताडोबा आणि दुसरे स्वर्गिय बाबा आमटे यांचे ‘आनंदवन’. 

      बसने आम्ही आनंदवन येथे पोहचलो. रिमझीम पाउस चालुच होता. स्वागतकक्षापासुनच आपण आनंदवन परिवाराचे सभासद होऊन जातो. आनंदवन हे एक अफाट मोठे कूटुम्ब आहे. ५००० कुष्ठ, अपंग व निराश्रीतांचे संगोपन इथे आनंदामध्ये चालु आहे.
प्रत्येक ठीकाणी वावरताना बाबांचे मंत्र सत्यात उतरलेले जाणवतात. ‘दान नादान बनविते’, ‘वेदना झाली साधना’ आणि ‘श्रम झाला श्रीराम’ ह्याचा प्रत्यय येतो. इथल्या विहीरी श्रमदानातुन तयार झाल्या आहेत. हातमागावर काम करणारी उत्तुंग आत्मविश्वासाची स्वावलंबी अपंग  शरीरे बघीतली की मागाच्या आवाजातून सुर ऎकु येउ लागतात ‘जिथे राबती हात तेथे हरी’.
         इथे काय बनविले जात नाही,अपंगाकरीता तीन चाकी सायकल, हातमागावरचे कपडे, ग्रिटींग्स, चप्पल ज्याला जे जमेल ते करण्यात प्रत्येक जण मग्न असतो. इथे निम्म्याहुन कमी हाताची बोटे असणारे हात बागेमध्ये हजारो फुल निर्माण करतात. 
                                              

आनंदवनाचा आणखी एक उपक्रम म्हणजे ‘उत्तरायण’. ह्याला वॄद्धाश्रम न म्हणता उत्तरायण म्हणायचे कारण आपण जे जीवन जगत आलो त्याच उत्तर शोधणारा हा प्रकल्प, असा पु.ल. स्वतः खुलासा करत असत. 
                                             
पावसांच्या सरींबरोबर अचानक आम्हाला स्वरलहरी ऎकु आल्या म्हणुन आम्ही तिकडे वळलो तर तिथे एक अद्ययावत ऑडीटॊरियम होते. रोजच्याप्रमाणे तिथे ‘स्वरानंदवन’ ह्या अपंगांच्या वाद्यवृंदाची प्रॅक्टीस चालली होती.गाणी, नाच सर्व काही जीव ओतुन. कोणतेही शास्त्रीय शिक्षण नसताना स्वर आणी ताल यांचा मेळ बघण्यासारखा. ह्याच नावही समर्पक ‘स्वरानंदवन’. ह्याच्या प्रयोगाला प्रत्यक्ष पु.ल. देशपांडे यांनी पेटीवर तर वसंतराव दॆशपांडे यांनी तबल्यावर ठेका धरला होता.
                                                                 

इथे आगत्यपुर्वक राहण्याची सोय आहे पण वेळेच्या अभावी आम्ही माघारी फीरलो. मात्र ‘स्वरांनंदवन’ चे एक गीत जी बाबांचीच कविता आहे ‘पांगळ्यांच्या सोबतीला येउ द्या बलदंड बाहु, निर्मीतीच्या मुक्तगंगा या इथे मातीत वाहू’ हे ह्रुदयात कोरुनच.
( शक्य झल्यास आनंदवनच्या वेब साइटला भेट द्या)




` आनंदवन भुवनी' ....1

आनंदवन भुवनी !!!


भगवान तुम्ही वारंवार सांगितलेत,
‘अत्त दिप भव्‌’
मी अंधार म्हणत होतो तिथे प्रकाश होता.
कदाचित मला डोळॆ असतील पण नजरेचा अभाव होता.

कॄष्णा तु सांगितलेस,
‘कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन्‌’
आशाकिरण लुप्त झालेल्यांच्या जीवनात,
स्वकतॄत्वाचा ध्यास निर्माण करणारा विकास तिथे होता.

हे जिझस्‌ तु दयेची देवता 
तु सांगुन गेलास सेवा आणि साधना हेच जीवन.
बाबा! आनंदाच्या एका झाडाच्या सावलीच्या शोधात असणाऱ्यांना तुम्ही आनंदवन दिलेत.
तुमचेच बोल शतकानुशतके स्फुर्ती देतील.
आसवांना वेळ नाही, दूःख उधळायास आता’.


रविवार, ४ सप्टेंबर, २०११

‘इथे इथे काय?’- ‘उदंड’

                                   ‘इथे इथे काय?’- ‘उदंड’
 लहानपणी घरात गणपतीबाप्पा असताना हमखास माझे आणि आईचे भांडण होत असे.माझ्या सगळ्या मित्रांकडच्या गौरी कशा छान असायच्या. सुंदर मुखवटा,त्याला छान साडी नेसवलेली असायची.आपापल्या कुवतीप्रमाणे दागीने मढवलेले असायचे. आमच्याकडे मात्र खड्यांच्या गौरी आणायची प्रथा आहे.
 घरात पहाटेपासुन गौरी घरात आणायची तयारी सुरू होत असे. आई,काकू,आत्या यांची पहाटेपासून गडबड चालू असे. सर्व घर शेणाने सारवले जाई. सर्व खोल्यांमध्ये छान रांगोळीने लक्ष्मीची पावले काढली जात. सर्व तयारी पुर्ण झाल्यावर झांज,टाळ,ढोलकी आणि पुजेचे साहित्य घेउन आम्ही  विहीरीकडे जात असू. गौरी आणण्यासाठी सर्व शेजारीही आमच्यामध्ये सामील होत असत.
     गौरी आणायचा मान घरी आलेल्या माहेरवाशीणीचा असे. विहीरीतील पाणी हाताने काढता येइल इतकी विहीर तुडूंब भरलेली असायची. स्वच्छ धुउन विहीरी काठचे खडे तबकात ठेवले जात. त्यांची पुजा केली जाई. खास गौरींसाठी तिळाची फुले आणली जात. छानशी वेणी त्या तबकातील गौरींना घातली जाई. सर्व स्त्रीया विहीरीतील पाण्याने चुळ भरत व तसेच न बोलता गौरी वाजत गाजत घरापर्यंत आणल्या जात.
         घराच्या उंबरठ्यापाशी दूध, कोमट पाणी यांनी आई सर्वांचे पाय धुवत असे. यानंतर दिवा ओवाळून गौरींना घरात आणत. घरातील एका-एका खोलीत माहेरवाशीण गौरींना घेउन जाई. प्रत्येक खोलीत गेल्यावर आई विचारत असे ‘इथे इथे काय?’ आणि आम्ही सर्व जण जोरात ओरडायचो ‘उदंड’. शेणाने सारवलेल्या, मातीच्या भिंती असलेल्या सर्व खोल्या निरांजनाच्या प्रकाशात आईने ‘इथे इथे काय?’ विचारले की आमच्या ‘उदंड’ या उत्तराबरोबर आपोआप श्रीमंत होऊन जायच्या. सर्व घर आनंदित आणि तॄप्त व्हायचे.
        सर्व घर गौरी फीरवल्यानंतर त्या गणपती शेजारी स्थानापन्न केल्या जात. नंतर त्यांची विधीवत पुजा केली जाई. ते वातावरण उदंड उत्साहाचे असे. घरी कोणीतरी माहेरवाशीण आल्याचा भाव प्रत्येकीच्या चेहऱ्यावर गौरींची पुजा करताना असे. त्या दिवशी समईच्या शांत प्रकाशात गणपतीची मुर्तीही गौरींकडे पाहतेय असे वाटायचे.
       आताही गौरी येतात,आमच्याकडेही आणी शेजारीही सुंदर मुखवट्याच्या. पण आता कुटुंबे विभक्त झाली आहेत. आता माहेरवाशीणी फक्त भेटतात लग्न समारंभाना अन्यथा फोनवर.आता घरात विज आलेय.लहानपणी गणपतीला ६-७ किलोमीटर चालत जाणारे आम्ही सर्व आता आपापल्या सवडीने गाडी घेउन जातो, लगेच परत येण्यासाठी.
         सध्याच्या जिवघॆण्य़ा स्पर्धेच्या काळात, भौतिक सुखांच्या गर्दित जो तो आपापल्या कोपऱ्यात स्वताःच स्वताःला विचारतोय‘इथे इथे काय?’ पण मायेचा आणि तॄप्तीचा ‘उदंड’ खरच हाती येत असेल?


शुक्रवार, २४ जून, २०११

संगमेश्वरी बोली....1

आमच्या संगमेश्वरी बोलीमध्ये वाक्यावाक्याला" जल्ल" हा शब्द वापरतात. आमचा आनंद, आमच दू:ख, आमची स्वप्न सगळ काही बोलताना आम्ही सहज" जल्ल" करून टाकतो, अस म्हणतात की भगवान पर्शुरामानी ह्या भूमीला शाप दिला होता
" जळेल तर उगवेल" म्हणून भात लावणीच्या आधी आम्हाला भाजणी करावी लागतेच.------------------------------------------------------------------------
*** 1 ***
हेरी काय नाय भाऊ पन आमचेच नशीबात,
जल्ल उजडायच्या आत का सांजावत,
उजडायच्या आत का सांजावत?

हाडाची काडा करून आंब शिंपलव,
पन मोहोराचा वास आल्यावरच आभाल का दाटत?
हेरी काय नाय भाऊ,पन आमचेच नशीबात,
जल्ल उजडायच्या आत का सांजावत?

रातसान याक करून चाकरमानी कमावतात,
पन गोठा सुदरायचा म्हटल की, आजारपन का उपाटत?
हेरी काय नाय भाऊ, पन आमचेच नशीबात,
जल्ल उजडायच्या आत का सांजावत?
ऊनात भाजून कवाल तोडायच, पावसाच्या टोंबात रोप लावायच,
पन कॉंब येताच भात का रोगाटत?
हेरी काय नाय भाऊ पन आमचेच नशीबात,
जल्ल उजडायच्या आत का सांजावत?

मांगनार काय जल्ला याक तरास हाय,
 पन काय देयाच म्हटल की,
वरल्याच्या बेंबीत का रिवरिवत?
हेरी काय नाय भाऊ पन आमचेच नशीबात,
जल्ल ऊजडायच्या आत का सांजावत?
उजडायच्या आत का सांजावत?


मंगळवार, २१ जून, २०११

संगमेश्वरी बोली

                                                 संगमेश्वरी बोली  
           भाऊनु नमस्कार!                          महाराष्ट्रात अनेक बोलीभाषा बोलल्या जातात. प्रत्येकीची गोडी वेगळीच आहे.अनेक कलाकारांनी ह्या भाषा वेगवेगळ्या माध्यमातुन समाजापुढे आणल्या आहेत त्यातीलच एक बोलीभाषा म्हणजेच `संगमेश्वरी बोली’.
       रत्नागिरी जिल्ह्यातील डोंगर कपारींचा एक तालुका संगमेश्वर. एका बाजुला डोंगर आणि एका बाजुला खाडी. ह्या तालुक्यातील बोलीभाषा म्हणजेच `संगमेश्वरी बोली.’

       भात, नाचणी,तीळ,आंबा,काजु आणि रातांबे म्हणजेच कोकम ही उत्पन्नांची साधने. बहुसंख्य गावातील पुरुष वर्ग चाकरमानी म्हणजेच नोकरीसाठी शहरात गेलेला.सध्या आमच्या संगमेश्वर तालुक्याचे वैभव असलेले अभिनेता वैभव मांगले हे या बोलीभाषेतुन तमाम रसिकजनांना हसवत आहेतच,
     पण स्वर्गीय दादा जोसेफ, स्वर्गीय पत्रकार विलास होडे,
संपुर्ण महाराष्ट्रात    संगमेश्वरी बोली’ हा एकपात्री कार्यक्रम करणारे श्री. आनंदा बोंन्द्रे, तसेच श्री ॠषिकेष बोंन्द्रे ही सर्व व्यक्तीमत्व संगमेश्वरी बोलीवर प्रचंड प्रेम करणारी यांच्याच प्रेरणेतुन संगमेश्वरी बोलीमध्ये लिहीण्याचा हा प्रयत्न.
     ही भाषा इथल्या पावसासारखी कोसळते,तिळाच्या फुलांसारखी डवरते, हापुसची गोडी देते तर उतारावरच्या नाचणीसारखी अंगावर येते.
    मंग काय समजलांव! म्होरल सगल आमी आमचे भाषेत सांगनार, काय? आइकताव ना?

शनिवार, १८ जून, २०११

खरच सांग माझॆ सावित्री !!!

 नाकी नथ लेवुन,हाती तबक घेवून पुजेला निघतेस,
 खरच सांग माझॆ सावित्री,
तु मनापासुन करतेस की संस्कॄती जपतेस?
 प्राईम टाइमच्या सिरीयलमध्ये सगळॆ सण साजरे होतात,
तेवढ्यापुरते का होइना आसुरी खेळ बंद होतात,
त्यांचे हसणे, सजणे नव्हे ना फ़ॉलो करतेस?
खरच सांग माझॆ सावित्री,
तु मनापासुन करतेस की संस्कॄती जपतेस?
सत्यवान होताच तसा की जीव ओवाळून टाकावा,
तुझ्यावर कोणाची सक्ती, तरीही उपास करतेस?
खरच सांग माझॆ सावित्री,
तु मनापासुन करतेस की संस्कॄती जपतेस?


सोमवार, ६ जून, २०११

रामदेव वर्सेस देवराम !!!

 बा! रामदेवा,सावध तुला देवरामांनी घेरल आहे.
 समुद्रमंथनातील विष आता,त्यांच्या हाती आले आहे. 

कायदा भले असेल तुमचा पण, व्यवस्था मात्र त्यांची आहे.
 साबरमतीच्या वाटेला सुद्धा हिंसाचाराचे कुंपण आहे.

 उत्तर त्यांचे द्यायचे असते ज्या प्रष्णांना अर्थ आहे,
 नका ताकद खर्च करु आमच्या कानात प्राण आहे.

 अत्याचारालाही सीमा असते,त्यांचे शस्त्र तेच आहे.
 गवतांचेहि होतील भाले, ही भुमि शहिदांची आहे.

  

गुरुवार, २८ एप्रिल, २०११

माझ्या डोक्यावर फार ओझ असत.....


माझ्या डोक्यावर फार ओझ असत.....
-------------------------------------------------------------------------
                                                                      
    स्लमडॉग मिलेनियरमधिल धारावीच रुप बघितल, वाईट वाटल.
ते साऱ्या जगासमोर मांडल, राग आला पण क्षणभरच कारण,
        ह्यात गुरफटणार कोण? हे अस अधुन मधुन घडतच असत,
             .....माझ्या डोक्यावर फार ओझ असत.
रस्त्यावरच्या अपघातांचे फोटो, टपावरुन प्रवास करणारे प्रवासी,
        अनवाणी पायांनी दुध घालणारा धनगर, 
       ४० डिग्री सेंटीग्रेड तापमानामध्ये रोडरोलरच्या चाकाचे डांबर,
      रॉकेलने पुसणारे हात.हे ही अस्वस्थ करत,पण ह्यात गुरफटणार कोण?
            .....माझ्या डोक्यावर फार ओझ असत.
 यंदा सातवीची स्कॉलरशिप झाली,नववी हा दहावीचा पाया,
        दहावी हा बारावीचा आणि बारावी अ‍ॅडमिशनचा,करीयरचा.
   बापरे! मग काय फीरायचे ते यंदाच, मला ह्याचही प्लॅनिंग करायच असत.
              .....माझ्या डोक्यावर फार ओझ असत.
पाचव्या मजल्यावरच्या हिरॉइनच्या टेरेस फ्लॅटवर चाललेली पार्टी,
        अन तळाशी बी.एम.सी.च्या दिव्यावर अभ्यास करणारी मुल,
       बड्यांच्या युवराजांची नशीली पार्टी,पोलिसांची रेड व सुटका,
       आणि भिक मागण्यासाठी अपंग करण्यात येणारे देशाचे भवितव्य,
       स्विस बॅंकेतिल काळ्या पैश्य़ांचे आकडॆ अन, कष्टकऱ्यांचे बुडणारे          
       फसव्या फायनान्समधील पैसे, सार काही अस्वस्थ करत 
       पण ह्यात गुरफटणार कोण?
                .....माझ्या डोक्यावर फार ओझ असत.
मित्राने हुंडाई घेतली, एकाने तळेगावला हॉलिडे होम, 
        एकाचा महाबळेश्वरला बंगला,मला सारख, सारख धावायच असत,
         मग ह्यात गुरफटाणार कोण?
             .....माझ्या डोक्यावर फार ओझ असत.
हे अस अस्वस्थ होण, अधुन मधुन छातीत दुखण,
       तुमच काय माझ काय सेम असत.
       तुमच्या नसेलही कदाचित, असेलही कदाचित, पण 
            .....माझ्या डोक्यावर फार ओझ असत,
            .....माझ्या डोक्यावर फार ओझ असत.












रविवार, १७ एप्रिल, २०११

संकटमोचनम

                                                                
                रत्नागिरी रेल्वेस्टॆशन, प्लॅटफॉर्म क्र.१, दुपारी १:०० वाजता मांडवी अपने मुंबईला जाण्यासाठी थांबलो होतो, तेवढ्यात सुचना झाली की गाडी १ तास  उशिरा येणार आहे. वाट बघणे क्रमप्राप्त होत. अश्यावेळी वेळ घालवायच हमखास साधन म्हणजे चहा. प्लॅट्फॉर्मच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या टी स्टॉलवर जावून चहा घेण्यासाठी चालत स्टॉलपाशी आलो. सहज लक्ष बाकड्याकडे गेले. तेथे भगवे कपडे घातलेले एक साधूबाबा बसलेले दिसले. त्यांच्याजवळ जावून त्यांना ’बाबाजी चाय पिओगे?’ विचारले तर चलेगा एवढच म्हणून ते हसले.मी स्टॉलवर जावून दोन कप चहा घेतला व त्यांच्याजवळ आलो.चहा घेता घेता आमच्या गप्पा सुरू झाल्या. मी म्ह्टल बाबाजी कुछ सुनाओ.ते म्हणाले बेटा तुला एक गोष्ट सांगतो ती माहीती असली तरी शांतपणॆ ऎकून घे, व ते शांतपणॆ सांगु लागले.
             ’प्रभु रामचंद्राचे दुत म्हणून हनुमानजी लंकेला लंकानरेश रावणाला समजावण्यासाठी आले. युद्ध टाळून सितामाईंना रावणाने सोडावे अशी शिष्टाई करायची होती. दरबारामध्ये हनुमान गेले तेव्हा रावण खूप उंचीवर आपल्या सिंहासनावर बसुन होता. हनुमानजींनी आपल्या शेपटीचे वेटोळे केले व रावणाच्या उंचीवर येवून रावणाला प्रभु रामचंद्राचा निरोप सांगीतला’.

              बेटा हा प्रसंग व ह्या पुढील सर्व तुला माहीती असेलच पण एवढ्यावरुन तुला काय वाटते ते सांग.   मी म्हटले बाबाजी हनुमान प्रभु रामचंद्राचे दुत म्हणून गेले होते तेव्हा त्यांचा अपमान होऊ नये म्हणून हनुमानजींनी चमत्कार करुन रावणाच्या उंचीवर जावुन त्याच्याशी वार्तालाप केला असेल. बाबाजी शांतपणे हसले.मी म्हटल बाबाजी काय झाले, तुम्हीच सांगा, तर ते सांगु लागले.
                ’बेटा त्या वेळी प्रभु रामचंद्रांच्या समोरील संकट होत ते म्हणजे लंकानरेश रावण. हनुमानजींनी विचार केला संकट आपल्यापेक्षा उंच, मोठ होता कामा नये. बेटा आपल्या आयुष्यातही असच असत, अनेक छॊटी-मोठी संकट य़ॆत असतात, पण संकटाला कधीच मोठ होऊ द्यायच नाही, नाहीतर आपण त्याखाली दबलेले राहतो. नेहमी संकटापेक्षा वर जावुन विचार कर अनेक सुटकेचे मार्ग तुला आपोआप दिसतील’.
                   बाबाजींच्या विचारांनी  अवाक होत मी त्यांना नमस्कार केला व बोगीच्या दिशेने चालु लागलो.     

गुरुवार, ७ एप्रिल, २०११

जलनिती

 
कीती वर्षे झाली आठवत नाही पण आमच्या गावातून एक कालवा काढण्याचे काम चालु आहे. काम पुर्ण होत नाही आणि कालव्याला पाणीही येत नाही. ह्या अनोख्या जलनिती बाबत थोडेसे .......
कॅनॉल
 

सोमवार, २८ मार्च, २०११

येता - येता --३

                                                                                   
पणजी-पुणे सेमीलक्झरी नेहमीच्या वेळीच पुर्ण भरुन सुटली, अन गोव्याची मस्ती चेहऱ्यावर मिरवत गाडी प्रवास करू लागली.त्यात तोच एकटा वेगळा वाटत होता. सावंतवाडीच्या हॉटेलमध्ये गाडी थांबली. तो बिअर व सॅन्डविच फ़स्त करत होता व सहप्रवाश्यांपैकी नववधुही जोडिदाराची नजर चुकवून त्याचे गोरेपण न्याहाळत होत्या. तो दुसरा तिसरा कोणी नाही तर एक हिप्पी होता. जग भटकायला निघालेला एक बेदरकार प्रवासी.

गाडी कणकवलीला थांबली. एका लहान मुलाला घेउन एक महिला एकटीच बसमध्ये चढली. बसायला जागा न्हवतीच, वाहकाने सांगुनही ती जायलाच पाहिजे म्हणून उभी राहिली. पेंगुळलेल्या डोळ्यांनी सहप्रवासी तिच्याकडे बघत होते. तो खाली उतरुन शांतपणॆ सिगरेटचे झुरके घेत होता.बस सुरू झाली,कंडक्टरने तिला तिकीट दिले व तो आपल्या जागेकडे निघाला अन अचानक तो जाग्यावरुन उठला `एनीबडी ह्याव न्युजपेपर?”तो विचारु लागला.त्याच्या हालचाली न्याहाळणाऱ्यापैकी दोघा-तिघांनी त्यांच्याजवळची वर्तमानपत्र त्याला दिली. त्याने शांतपणे ते पेपर पॅसेजमध्ये पसरले,रॅकमधील आपली सॅक हातात घेतली व त्या महिलेला ”प्लीज सिट डाउन”म्हणत त्याने आपली जागा रिकामी करुन दिली व तो शांतपणे त्या पेपरवर सॅक उशाला घेउन झोपी गेला.ती स्त्री कोल्हापुरला उतरली तरी तो शांतपणे पॅसेजमध्ये झोपी गेला होता, निरागस मुलासारखा.

खरच मग सांगा माणुसकीला धर्म, देश अस काही असत? ती असते ह्लुदयात आणि वावरते माणसाच्या वर्तनामध्ये.

बुधवार, २३ मार्च, २०११

येता -येता----२

                                                 
              कोकणरेल्वे सूरु झाल्यापासून आम्ही रत्नांग्रीकर मुंबईला जाण्य़ाचे निमीत्त शोधत असतो. आधीच कोकणी माणूस आणि मुंबई यांच नात वेगळच आहे. नारळीपौर्णिमा दोन दिवसांवर आलेली, त्यात दोन दिवस सुट्टी अर्थात सुट्टी नसली तरी मी या दिवशी हटकून कोळीवाड्यात जातोच तसा या वर्षीही नीघालो होतो रत्नागिरी - दादर पॅसेंजरने.
           एकतर तिकीट अगदीच कमी, त्यात आजुबाजुला गावची आपली माणस, बाहेर हिरवेगार कोकण आणि मध्येच सणसणत येणारी पावसाची सर जबरदस्त माहोल. खर तर प्रत्येकाने एकदातरी ह्या दिवसात या पॅसेंजरने प्रवास करावाच.एक एक स्टॆशन पुढे जात होतो.आपल्या मुंबईतल्या चाकरमान्याला सुके मासे,तांदूळ, हळद जे जमेल ते घेउन जो-तो मुंबईला निघाला होता.खेड स्टेशन गेले नी मी वाट पाहू लागलो. इथून गाडी भरते ती गावठी भाज्या विकणाऱ्या शेतकरी महिलांनी. वांगी, काकड्या, दूधी, मिरच्या सगळ्या टोपल्या भाज्यांनी भरलेल्या. मी ह्या सगळ्या भाज्या हटकून घेतो.त्या दिवशीही एकीला थांबवली. थोडी भाजी घेउन होतोय न होतेय तोवर एकदम पळापळ सुरू झाली. सर्व भाजी विकणाऱ्या महिला डोक्यावर टोपल्या घेउन धावू लागल्या.मी तीला काय झाले म्हणून विचारले तर म्हणाली" आधी पायाखाली टोपली लपवा, पास नाय ना,रेल्वेपोलीस आलेत."एवढ म्हणत ती धावत निघुन गेली. तेवढ्यात खरोखरच टी.सी. व रेल्वेपोलीस आले. इकडे-तिकडे तपासत निघून गेले. मी ती टोपली त्यांच्या नजरेला पडणार नाही याची पूरेपूर काळजी घेतली होती.डब्यात आता यावर चर्चाही सुरू झाल्या होत्या. अर्धा तास झाला असेल, मध्येच एक स्टेशनही येवून गेले, नी ती आली. थोडीशी घाबरलेली. "टोपली हाय ना?"मी खूणेनेच बाकड्याच्या खाली खूण केली व तीची टोपली बाहेर ओढली. ’लपलो होतो’,हे पोलीसवाले मध्येच कधीतरी येतात, सगळी भाजी टाकून देतात.काय करणार परमिशन नाय ना? रेल्वे झाली, भाजी विकून चार पैसे मिळायला तरी लागले.भाऊ तुम्ही मदत केलीत म्हणून माल तरी वाचला. मी घेतलेल्या भाजीचे पैसे विचारले तर म्हणाली’ थांबा एवढी भाजी विकून येते घेयाला.गाडी पूढे जात होती, थोड्याच वेळात पेण स्टेशन येणार तेवढ्यात आली व मला म्हणाली’ भाउ हात पुढे करा! मी भांबावून बघू लागलो तर म्हणाली’ पूढच्या डब्यात पुतण्या राख्या विकतोय त्याला शोधत होते, उंद्या राखी पौर्णिमेला तुम्ही भेटाल न भेटाल तेव्हा आजच बांधते.मी हात पुढे केला, तिने राखी बांधली.एक काकडी कापून मीठ टाकून देत म्हणाली’ मी सुनंदा, कासु गावची,भाउ या कधीतरी’ आणि बाहेरचा अंदाज घेत म्हणाली, पेण आल आता उतराया पाहिजे, डोक्यावर टोपली घेत निघुन गेली. मी ही नारळीपौर्णिमेच्या उत्साहात विसरून गेलो.
              अनंतचतुर्दिशीला मुंबईला यावेळी गाडी घेउन निघालो होतो. हायवेने मस्त गाणी ऎकत जात असताना अचानक बोर्ड पाहिला’ कासु’ व गाडी थांबवली.डाव्या बाजुला ओळीने कौलारू घरे, भाताच्या मळ्या पहात होतो, ही आश्चर्याने म्हणाली’ काय रे कधी गाव पाहिले नाहिस का?’ मी उजव्या हातावरच्या धाग्याकडे बघत म्हट्ल’ ह्या गावात माझी बहिण राहते’ आणि स्वत:शिच हसलो.हिला कळलच नाही मी का हसतोय ते, पण गाडी सुरु करताना ठरवल एकदा तरी गावात जायच नी भेटायच माझ्या बहिणीला अर्थात "सुनंदाला".

येता -येता----१

                                                        
गुहागर _ अक्कलकोट गाडी धावतच पकडली . आड्व्या सिटवर जागाहि मिळाली.समोर सर्व सीट्स जवळपास भरलेल्या.बरेच जण माझ्याकडॆ बघून नमस्कार करत होते. अश्या अनोळखी व्यक्ती नमस्कार का करतात म्हणून मी गोंधळून आजुबाजुला बघितले तर लक्श्यात आले की डॊक्यावर स्वामी समर्थांचा फोटो होता व सर्वजण त्याला नमस्कार करत होते.फोटो बघितला, कोणीतरी सप्रेम भेट दिला होता व त्याखाली लिहले होते कॄष्णमुर्ति ज्योतिषि, सर्व समास्यांचॆ निवारण करुन दिले जाईल व त्याखाली स्वत:चा फोन नंबर दिला होता. समर्थांचा फोटो भेट देवून स्वत:चीच जाहिरात जास्त केली होती.
आजकाल हा ट्रेंड्च झालाय़. प्रत्येक भेट ही व्यावाहारिक झालॆय़. वर्तमानपत्रात रोज कोणाची ना कोणाची तरी बातमी येत असते ,मोफत वही वाटप, मोफत फळे वाटप, वाढदिवसाबद्दल देणगी वगैरे पण त्यात देणाऱ्याचा फोटोच मोठा असतो. अश्या अनेक भेटींमागे कारणे वेगळीच असू शकतात, अन्यथा त्याची जाहिरात करण्याची गरज का भासावी? शुभ प्रसंगी दिल्या जाणाऱ्या भेटींचेही हिशोब ठेवून त्याचा परतावा केला जातो. याला सप्रेम भेट म्हणायचे का?
मोठया माणसांचे राहू दे, गेल्याच महिन्यात माझा मुलगा प्रतिक ह्याचा वाढदिवस होता,त्याच्या खरेदीसाठी गेलो असता म्हणाला‘बाबा गिफ़्ट शॉपीमध्ये चला!’ मी कशाला म्हणून विचारले, तर म्हणाला" रिटर्न गिफ़्ट घ्यायचे आहेत. मी कशाला विचारले तर म्हणाला जस्ट फ़ॉरमॅलिटिज अस काहिस बडबडला. गिफ़्ट लगेच परत करायचे असते हे पूढ्च्या पिढीतही रुजू लागलेय. यावरुन भावनेपेक्षा व्यावहारिकता जास्त महत्वाची ठरतेय अस म्हणायचे का? कदाचित म्हणूनच आजकाल भेटीबरोबर सप्रेम भेट न म्हणता शुभेच्छापूर्वक असच जास्त म्हटल जात नसेल?