गुरुवार, ७ एप्रिल, २०११

जलनिती

 
कीती वर्षे झाली आठवत नाही पण आमच्या गावातून एक कालवा काढण्याचे काम चालु आहे. काम पुर्ण होत नाही आणि कालव्याला पाणीही येत नाही. ह्या अनोख्या जलनिती बाबत थोडेसे .......
कॅनॉल
 
मे महिन्यात काजुच्या तटात जाताना,
कॅनॉलच्या कडेला म्हातारी इंदिरा दिसली नी,
मी ’वो इंदिरा’ म्हणून हाक मारली.
आकेशियाच्या सावलीत विसावलेल्या त्या म्हातारीने,
डोळॆ किलकीले केले व ’ बावा काजविणीत काय रे? म्हणुन विचारले.
म्हातारे काय गे?मी विचारले.
हेरी काय, कालवा म्हणून तिने उसासा टाकला.
बावा थोरल्या जग्याच लगीन झाल त्या वर्साला जमीन घेतल्यांनी,
चार झाडमाडा होती, पान सुपारीची लाचारी तरी न्हवती.
ती पण गेली मातीत.
आता बारक्याच पोर मोठ्या शाळत जात तरी पाणी न्हाय रं.
धा-बारा वर्सा झाली, निस्ती जमीन खोदल्यांनी.
दर वर्साला पावसाल्यात माती ढगरते, उन्हाल्यात ती खनतात.
खोदणाऱ्यांचे बंगले झाले पण माझ्या पावट्याला काय पानी नाय रे?
झाडामाडा आसतील तर पानी येयल आनी पानी आसल तर झाडा जगतील नाय?
जल्ली झाडा तोडल्यांनी नी पानी हाय सोंबाच्या जिमिनीत.
तां वर येइल तवा येइल.
मी म्हातारीच्या डोळ्य़ात बघीतल नी वाटल.
एका तुळशीच्या पानाने सुवर्णतुला करणाऱ्या ह्या भुमीत,
म्हातारीच्या डोळ्यातील एका थॆंबाने कालवा का भरत नाही?
इंदिरेची समजुत मला काढता येइना पण,
विज्ञानयुगात वावरणाऱ्या मी माझीच समजुत काढली,
न्युट्नचा नियमच आहे, क्रिया तिथे प्रतिक्रीया.
तशीच या जलनीती बरोबर अनितीही आली नसेल?
 
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा