सजावट
सकाळी ऑफ़ीसला जाण्यासाठी गाडीला कीक मारली.पावसाने आता पुर्ण विश्रांती घेतली होती व सकाळी धुक्याचे साम्राज्य सुरु झाले होते. नेहमी प्रमाणे पेपर घेण्यासाठी थांबलो. स्टॉल मोकळा सोडून काका कुठेतरी बाजुला गेले होते सहज लक्ष समोरील बस स्टॉप कडे गेले. आपल्या उजव्या खांद्यावरील झोळीत असलेले लहान मुल त्याचे टक्कल असलेले डोके योग्य प्रमाणात बाहेर ठेवत त्या मुलाची रचना करत एक भिकारीण उभी होती. बहुतेक ते मुल झोपलेलेच असावे. तेव्हडे झाल्यावर तीने स्वतःच्या कपड्यांकडे नजर फीरवली. आपण बाहेर जाताना जसे कपडे ठीक-ठाक आहेत ना हे पाहतो तसे तीने आपले दारीद्र्य योग्य रीतीने दिसते आहे ना याची खात्री केली असावी. एव्हढ सगळ झाल्यावर डाव्या खांद्यावर आणखी एक झोळी लटकवत भिक मागण्यासाठी ती सज्ज झाली. तीची ती तयारी बघीतली नी मनात विचार आला भिक मागण्यासाठी आवश्यक अशी ती एक सजावट होती. तीच्याकडे बघुन कोणाला दया आली तरच तीला भिक मिळणार होती. काकांची वाट पाहुन पुन्हा गाडी सुरु केली व मनामध्ये विचार आला रोजच्या जीवनामध्ये आपण अशा अनेक सजावटी बघत असतो. आधी पोटोबाच्या न्यायाने डोळ्यासमोर पहीला आला आमचा भाजीवाला.
वांगी,भेंडी, मुळा,सुरण, बीट, गाजर,मिरची, कोथींबीर ह्या सर्व भाज्यांची मांडणी अशी केलेली असते की त्याच्या स्टॉलकडे लक्ष जातेच.नीट एकमेकांवर ठेवलेल्या भाज्या,त्यांची रंगसंगती सर्व काही मन लावुन केलेले. सध्याच्या महागाइच्या काळात ४ पैकी १ वांग हमखास जुन्या शिल्लक मालातील तागडीत टाकूनही,घरची ओरड ऎकूनसुद्धा माझ्यासारखे अनेक जण हमखास तिथेच भाजी घेतात.
फुटपाथवरील माल विक्रेते केवळ सजावट व मांडणीच्या जोरावर आपला माल खपवत असतात.
बुधवार आणी रविवारी हमखास भेट होते ती मित्राबरोबर अब्दुलच्या माश्यांच्या स्टॉलची. तो ज्या पद्धतीने वेगवेगळॆ मासे कडाप्प्यावर मांडून ठेवतो ते बघण्यासारखे असते. एव्हड्या मोठ्या ढीगातुन मित्राला साहेब वेगळे ठेवले होते म्हणत पापलेट, सुरमई सहज काढून देतो.
गेली अनेक वर्षे आणखी एका ठीकाणी मी हमखास जातो ते म्हणजे राजुची पानपट्टी. पूढे खाउच्या बरण्या, काचेच्या कपाटात नीटपणे मांडलेली सिगरेट्सची पाकीटे, एका बाजुला वेगवेगळ्या तंबाखुच्या डब्या, मसाला पान बनवण्यासाठीचे सर्व घटक एका ओळीमध्ये नुसते बघीतले तरी पान खावस वाटाव अशी रचना. बरेच वर्षांनी हल्ली त्याने मला सांगीतले की ह्यातली निम्मी पाकीटे व तंबाखुच्या डब्या रिकाम्याच असतात पण कपाटे भरलेली दिसल्याशिवाय गिऱ्हाइक येत नाहीत म्हणे.
आजकाल कपड्यांच्या दुकानामध्ये वा शोरुममध्ये कपड्यांची मांडणी अश्या पद्धतीने केलेली असते आपण मोहात पडून खरेदी करतो. तिथे मॉडेलला घातलेले टि-शर्ट मी घातल्यावर चांगले दिसत नाहीत हे माहीत असूनही मी पुन्हा पुन्हा खरेदी करतोच.
अशा अनेक गोष्टी केवळ सजावटीमुळे आपणाशी निगडीत असतात पण आमच्यासारखे नोकरी करणारेही रोज सजावट करत असतातच की! फक्त आमच्याजवळ मांडण्यासाठी असतात शब्द. घरी बायको बरोबर, रजा न मिळाल्यामुळे गावी येता येत नाही हे सांगताना आई-वडीलांबरोबर, सिग्नल चुकवल्यावर पोलीसांबरोबर, ऑफिसमध्ये बॉस बरोबर, मालकाबरोबर, कर्जाला जामिन रहा म्हणून सांगण्यासाठी मित्राबरोबर एक ना अनेक सजावटी करून आपणही रोज मार्ग काढतोच ना?


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा