बुधवार, २९ मे, २०१३

आगोट


मे महीन्याची सुट्टी पडली की माझा मुक्काम निवे बु. येथे असे. अर्थात त्यावेळी खास उन्हाळी व्यक्तीमत्व शिबीर नसावीत आणि मुंबई ,पुणे यासारख्या शहरात असलीच तरी त्याच कौतुक संगमेश्वरसारख्या दुर्गम भागातल्या आम्हाला न्हवतजी काही जडणघडण होत असे ती निसर्गाच्या सान्निध्यात, शेतीवाडीमध्ये आपल्या माणसांसोबत वावरताना होत असे.
                
सुट्टी मधला माझा टाईमपास म्हणजे भाउकाकांबरोबर काजूच्या बिया गोळा करणे, सुपारीच्या बागेची साफसफाई करणे, हाफुस आंब्याच्या पेट्यांवर शाईने नाव पत्ता लिहिणे मात्र मला सर्वात जास्त आवडायचे ते पायरहाटावर बसून विहिरीचे पाणी काढणे. याची दोनतीन कारणे होती, एकतर भाऊनी त्या रहाटाला जे घुंगरू बांधले होते त्यांचा सुंदर आवाज यायचा आणी रहाटावरून सुपारीची बाग दिसत असल्यामुळे पाणी फिरवण्यासाठी तिथे बसून ऑर्डर सोडता यायची यामुळे उगाच मोठे झाल्यासारखे वाटायचे त्याच बरोबर आणखी एक गंमत होती खळ्यामध्ये (अंगणामध्ये) कोण आल की आजीची ऑर्डर यायची ' रहाटावर कोण  आहे ? त्यालापण दे हो' असा दोनतीन वेळा चहाही व्हायचा.
            
आज हे सगळ आठवायचं कारण म्हणजे पेपरमधल्या दोन बातम्या. पहीली बातमी' नाशिकमधील भ्रष्ट अधिकाऱ्याकडे सापडली कोट्यावधींची संपत्ती ! संपत्तीची मोजणी अजूनही चालूच !' आणी दुसरी चिपळूण मध्ये खोती विरुद्ध परिषद संपन्न .'
            
त्या दिवशीही मी असाच रहाटावर पाणी काढत होतो. नाना अंगणामध्ये नांगराची दुरुस्ती करत होता. 'नाना घडशी' आमच्या दुकानापासून बागेपर्यंत सर्व काही सांभाळणारा आमच्या घरातील महत्वाचा घटक. ' भाउनु वायच पैस पायज होते' नानाने हळूच भाऊ काकांकडे विषय काढला.' कशाला रे  मध्येच?' पानाला कात लावता लावता भाऊ काकानी विचारलं. 'येत्या आईतवारी आगोटी साठी देवारुखास जायचय,. दोन्पारपावत कामावर पन नसन, दोनच्या यष्टीन परत येयन मंग सांजाव पावत थांबन, काय ?'
                   
भाऊ काका पान खात खात घरामध्ये गेले अन नाना समजला भाऊ आपल्यासाठीच पैसे आणायला गेले आहेत . तो खुशीमध्ये गाण गुणगुणायला लागला. भाऊ काका घरामध्ये गेल्याचे बघून मी नानाला विचारले' नाना आगोटीला म्हणजे काय रे ?'
            '
जल्ली शालत जाताव ना तुमी? तुमान्ला आगोटीला म्हायत नाय?' मी रहाट ओढता ओढता नकाराची मान हलवली. ' बावा पावसाला आला ना ! मंग तयारी कराया नुको? कान्द घेया हवत,सुक म्हावर घेया हाव, तीकाट, इरल्यासाठी पल्यास्टीकचा कागुद, वर बघ घुमाट जमाय लागलंय!'
           
पावसाळया पूर्वीच्या तयारीला नाना आगोट म्हणत होता तर आजी त्याला बेगमी म्हणायची. कीती धावपळ असायची तीची. मोठमोठ्या बरण्यांमध्ये लोणची घातली जायची,धान्य वाळवून ठेवणे, पापड घालणे, उकडांबे, कोकम.,आमसूल अशी भली मोठी यादी असायची आणी नानाची आगोटीची तयारी फक्त अर्ध्या दिवसात? मी नानाला विचारले ' नाना अर्ध्या दिवसात तुझी आगोट ? आजीच्या तयारीला तर महिना पुरत नाही.' नांगर उचलत नाना म्हणाला ' बावा खोताची आगोट खंडीभर '
            
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रयत्नातून आणी प्रेरणेने आज बहुतांशी खोती संपविण्यात आपण यशस्वी झालो आहोत पण ही कुठली आगोट सुरू आहे? पावसाळयासाठी तीनचार महिन्यांची बेगमी  करता करता जमेल त्या मार्गाने पिढ्यांपिढ्याची बेगमी करण्याची ही कुठली प्रवृत्ती वाढीला लागलेय?
            
स्वातंत्र्य, समता आणी बंधुता ह्या मार्गावरून प्रवास करताना स्वातंत्र्याचा गैरफायदा घेणार्यांची संख्या दिवसेंदिवस कशी वाढू लागली? समाजाच्या सेवेसाठी आणी उत्कर्षासाठी दिलेल्या अधिकारांच रुपांतर आधुनिक खोती मध्ये कस होऊ लागल?
          
गरज आहे ह्या अवैध बेगमीची रसद तोडण्याचीमंग बघताव काय ? सामिल व्हा ------------

1 टिप्पणी: