प्रसाद ' रक्षण ' करता
यावर्षी गणपती बाप्पाच्या तयारीसाठी आदल्या दिवशीच संध्याकाळी गावाला पोचलो. कधी एकदा घरी पोचतो नी मखराचे काम सुरु करतो असे प्रतीकला झाले होते. त्याने तात्काळ देवघराकडे धाव घेतली. आमचा आवाज ऐकला अन तो आला. त्याचा बाबाही असाच येत असे.
गावात आता वीज
आली होती. मुलाचं
मखर बनवण चालू
होत. त्यांच्या त्या
गडबडीमध्ये तो मात्र
समंजसपणे वावरत होता. प्रतीकची
आवड सांभाळत उपलब्ध
सामनामध्ये मखर अधिक
आकर्षक कस करता
येईल ते समजावत
होता. त्याच्या मागोमाग
त्याची म्हातारी आजी आली.
आता तीलाच त्याला
सांभाळाव लागत होत.
लांब बसून ती
नातवाला न्ह्याहाळत होती. एव्हड्यात
वीज गेली अन
सर्वत्र काळोख पसरला. मुल
हिरमुसली, तो मात्र
कंदील शोधू लागला.
कदाचित परिस्थितीनेच आहे त्यातून
मार्ग शोधण्याची नजर
त्याला दिली असेल.
एव्हड्यात त्याने आपल्या आजीला
बघितले आणि म्हणाला
' आये ! पैसे देवून
ठेव , प्रसादीला साखरफुटाणे
आणतो '. म्हातारीने पटकन माझ्याकडे
बघितले, त्या कंदिलाच्या
प्रकाशात तिचे डबडबलेले
डोळे मला दिसू
नयेत म्हणून ती
उठली आणी पडवीत
झोपाळ्यावर जावून बसली. बरेच
दिवस वंगण न
मिळालेला झोपाळा कर- कर
आवाज करू लागला.
त्या शांततेत ती
झोपाळ्याची कर -कर
मला भूतकाळात घेवून गेली.
' आत्ता प्रतिक आणी तो
जसे एकाच वयाचे
तसेच त्याचा बाबा
नाथा आणी मी.
तोही त्यावेळी असाच
पोरका. माझ्या लहानपणी गणपतीला
गावी जायचे म्हणजे
मोठी तयारी असायची.
गावाचे घर बंद
असायचे त्यामुळे किराणा सामान
ते पूजा साहित्य
सर्व बरोबर घ्यावे
लागायचे. त्यात वाहतुकीचे साधन
नाही त्यामुळे पायी
प्रवास . तरीही मजा यायची.
जमेल तेव्हडे ओझे
घेऊन आम्ही गावी
निघायचो . त्याची आई त्यावेळीही
आम्हाला न्यायला ७-८ किलोमीटर चालत यायची.
वाटेत प्रवासात हा
मामाचा डोंगर हा भाच्याचा
डोंगर , इथे मोर
येतात अस जे
जमेल ते दाखवत
आम्हाला कंटाळा येणार नाही
अशा गमती सांगायची.
घरी येईपर्यंत संध्याकाळ
व्हायची. गावी वीज
न्हवतीच. त्यामुळे कंदिलाच्या प्रकाशात
नाथा आणी मी
मखर करायचो. त्याची
आई चुलीवर कुळथाचे
पिठलं करताकरता त्याला
बघत असायची. मखर
करताना मी कंटाळून
झोपी जायचो पण
सकाळी उठून बघाव
तर माझ्या मनासारखे
मखर तयार असायचे.
त्यावेळी आजच्या सारखेच गाव
चाकरमान्यांनी गजबजलेले असायचे. मात्र
प्रत्येकाच्या घरात गणपतीच्या
प्रसादाला हमखास एकच असे
ते म्हणजे ' साखर
फुटाणे'. ते मात्र
मुठभर मिळत.
दुपारच्या जेवणानंतर नाथा
मला घेवून बाहेर
पडे, आजूबाजूचे गणपती
बघण्यासाठी. सोबत एक
पिशवी. प्रत्येकाकडे मिळणारे साखर फुटाणे
तो पिशवीमध्ये जमवत
असे`. गणपती विसर्जन
होई पर्यंत आमचा
हा दिनक्रम
चाले. मलाही फिरायला
मित्र असल्याने मी
आनंदाने त्याच्या बरोबर जात
असे. एके दिवशी
दुपारी नाथा कडे
गेलो. तो घरी
न्हवता. त्याची आई चुलीवर
पातेल ठेवून जवळच
बसली होती. बहुतेक
चहा करत असावी.
मी नाथाची चौकशी
केली अन सहज
तिला विचारले ' मावशी
नाथा रोज पिशवी भरून साखर फुटाणे गोळा करून काय करतो ?'
काही न बोलता डबडबलेल्या डोळ्यांनी तिने बोट केले
. मी भिंतीवरचा अल्युमिनियमचा डबा काढला. तिने खुणावतच तो उघडला. तो साखर फुटाण्यांनी
भरलेला होता. तिने झाकण लावले.
' सोन्या महागाई किती झालेय , थोडीशी चहा पावडर आणी
चहाची गवती पात जमते पण गुळ, साखर नको परवडायला? दिवसभर पावसात रानामध्ये गुराढोरा मागे धावून घरी
आल कि चहा प्यावीशी वाटते , पोर पण भिजून शाळेतून येतो त्याला पण द्यावीशी वाटते पण
बिचारा मागत नाही . मग गणपतीतून हा असा दिवसभर वणवण फिरतो नि जमवतो साखर फुटाणे. निदान
फुडचे दोन महिने तरी माझा चहा हे साखरफुटाणे घालून होतो '
तिने पदराने चुलीवरचे पातेले उतरले अन मला च्या
घे म्हणाली . मी तसाच धावत घरी आलो. त्या नंतर मी कधीच तो मरेपर्यंत त्याच्याशी भांडलो
नाही , खेळताना सुद्धा .
मी भानावर आलो तेव्हा झोपाळ्याची कर - कर थांबली
होती , बहुतेक ती दोघ गेली असावीत. मात्र आजही कुठेही साखर फुटाणे मिळाले कि मी एखादा
दाणा नाईलाजाने तोंडात टाकतो पण डोळ्यासमोर येतो अल्युमिनियमचा डबा..

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा