सोमवार, १६ जानेवारी, २०१२

सुदाम्याचा तिळगुळ

                                                        सुदाम्याचा तिळगुळ
         तो आज खुपच उत्साहात दिसत होता. गेल्ये कित्येक दिवस थंडी असल्याने केवळ आवश्यक तेव्हाच तो गुहेबाहेर येत होता.अस असुनही तो त्यातल्या त्यात सुखी होता त्याच्यासारख्या इतरांपेक्षा. काही काळापूर्वी त्याला दगडांवर दगड घासुन अग्नी पेटवण्याची कला प्राप्त झाली होती, आणी त्याचा उपयोग करुन त्याने गुहेबाहेर बरीच आग पेटवली होती. त्याच्या उबेमध्ये झोपलेला असताना त्याला भयानक स्वप्न पडल होत.कोणी अनामिक कानात काही सांगुन गेला होता.आता फक्त त्याच्या जाण्याची खोटी होती,ती गुहा त्याला त्याच्या मागच्या जन्मांविषयीचा माहितीचा खजिना खुला करणार होती. त्याला नुकतेच त्याचे नाव कळले होते ‘श्रीहरी’. जन्मोजन्मी हे तुझेच नाव होते. हे शब्द त्याच्या कानात पुन्हा पुन्हा ऎकू येत होते.
          चालता चालता त्याने पुन्हा एकदा स्वत:कडे पाहिले, गरजेपुरते कातडे फक्त त्याने ओढले होते. वाटेत कुठे शांत पाणी असेल तर त्यात स्वत:चा चेहरा पहावा असा विचार त्याच्या मनात आला अन तो एकदम चमकला. असा विचार त्याला पहिल्यांदाच आला होता. कदाचित मागील जन्माच्या आठवणी हळुहळू जागृत होऊ लागल्या होत्या.
              हे सगळे संकेत त्याच्यासाठी शुभ होते. आता आपल्या अनेक प्रष्णांचा उलगडा होणार याबाबत त्याच्या मनात तिळमात्र शंका उरली नव्हती.समोरच्या झाडावर लटकलेली फळ पाहुन त्याला भुकेची जाणीव झाली. ही भुक मात्र सर्व जन्मात सारखीच असावी. त्याने पोटभर फळॆ खाल्ली व काही स्वत:जवळ ठेवली. नकळत झालेल्या ह्या कृतीने तो दचकला. असा संचय करण्याचे त्याच्या मनात कधीच आले नव्हते. पुर्व जन्मांचा अंमल हळुहळू चढत असावा. या कृतीवर विचार करताना त्याला कुठल्यातरी मागच्या जन्मातल आठवल,नी तो स्वत:शीच हसला. पोट भरल्यावर उरलेले फळ खाली टाकल्यावर त्याला माकड्चेष्टा म्हणत असत मात्र एक तिळ सात जणांनी वाटून घ्यावा अस म्हणत गोदामामध्ये वेगळी साठवण करायची असते व त्याला व्यवस्था म्हणायचे असते अस काहीस अस्पष्ट त्याला आठवू लागले. मात्र काही असु दे हे सार आपल्या फायद्याचे आहे हे हळूहळु त्याच्या लक्षात येउ लागले होते.मागच्या जन्मात आपल्याला भरपुर काही माहीत असावे असा विचार त्याच्या मनात आला नी त्याची केसाळ छाती अंमळ पुढे आली, त्याने मान वर करुन  पाहीले आणी त्याला स्वप्नात सांगीतलेली गुहा काही अंतरावर दिसली.धावत धावत तो त्या गुहेपाशी आला. मेंदुला ताण देवुन त्याने स्वप्नातले आठवले.पुन्हा पुन्हा आठवुन खात्री करुन घेतली व  धीर करुन  तो ओरडला‘तिळा तिळा दार उघड’ आणि तो ओरडतच राहिला‘तिळा तिळा दार उघड’. काही क्षणातच प्रंचंड आवाज होत त्या गुहेच्या दरवाज्याजवळील दगड बाजुला झाले. त्याने अनाहुत मिटलेले डोळे उघडले, आत जाण्याचा मार्ग त्याला स्पष्ट दिसत होता.तो हळुहळू आत सरकला. आत अंधार सुरु होताच त्याची कशालातरी धडक बसली. त्याने नीट निरखुन बघीतले,त्याला स्पष्ट आठवले ते मेणाचे पुतळे होते. एका एकावर हात फिरवताना त्याचा उर भरुन आला. ह्या सर्वांशी बोलण्याची त्याची इच्छा अपुरी राहिली होती.मात्र आता ते सर्वजण शांत उभे होते. त्याने इकडे तिकडे बघीतले, त्याला एक दोरी दिसली नी त्याचे डोळे चमकले. आपल्या मनात आलेल्या विचाराने मात्र त्याचे आतडे तिळतीळ तुटत होते. ते त्याच्यासाठी पुतळे नव्हते तर ती त्याची आवडती व्यक्तीमत्व होती. लगेचच तो भानावर आला. पुढे जायच असेल तर प्रकाश आवश्यक आहे हे त्याला जाणवल. त्याने त्यातल्या एका पुतळ्याची मेणबत्ती केली. जवळच्या  दगडांनी पेटवलेल्या आगीने ती मेणबत्ती पेटवली. आता आत लख्ख प्रकाश होता.त्याला हळुहळू सर्व प्रसंग आठवू लागले.कुठच्यातरी जन्मामध्ये तो त्याचा जीवलग मित्र होता. ते एकत्र शिकले होते. ‘सुदामा! हो सुदामा!’ त्याचे नाव. ते मित्र प्रेम आठवताना त्याचा उर अभिमानाने भरुन आला.थोड भानावर येताच त्याला जाणवल नेहमी सावलीसारखा जवळ असाणारा सुदामा गेला कुठे? आपण एकटे कसे पडलो? डोक्याला ताण देत पुढे पुढे जात असताना त्याला काही वस्तु दिसल्या. त्यावरचा चेहरा त्याला ओळ्खीचा वाटला. अरे आपण असेच दिसत होतो की? त्याने एक एक वस्तु निरखायला सुरवात केली, तस तसा त्याचा चेहरा उग्र होऊ लागला. त्याच्या बुद्धिमत्तेच्या व स्मरणशक्तीचा उपयोग करावा म्हणुन तो प्रस्ताव सुदामानेच त्याच्यासमोर ठेवला होता.जिभेवर तिळही भिजत नाही असे लोक आपली फुकटची  प्रसिद्धी करतील याची त्याला खात्री होती. हळुहळु सत्संग सुरु झाले,शेकडो हजारो, लाखॊ लोग त्याच्या भोवती जमा होऊ लागले.जगबुडी येणार व केवळ शीष्यगण जगणार हा प्रचार जगभर करण्यात आला. करोडो रुपये खात्यावर जमा होऊ लागले. आपल्याभोवती कडेकोट सुरक्षा करत सुदामा मात्र लांब लांब रहात होता. त्याने जणु गुलाम केले होते आपल्याला, या विचारा बरोबर त्याचा संताप शिगेला पोहोचला. त्याला पुढचे सर्व आठवू लागले.सगळीकडे भयानक ऊद्ध सुरु झाले.सर्वच वाताहात सूरु असताना सुदामा मात्र गायब झाला, सर्व संपत्तीसह आणी तो दिवस ऊजाडला. विनाश! एकही जिव वाचला नाही.मात्र सुदामा? तो कुठे? बर जिथ गेला तिथ जगला की तिकडेही सर्व आपल्यासारखेच. आता त्याचा श्वास जोराजोरात व्हायला लागला. तो असंबद्ध बडबडत सुदाम्याला शिव्या घालत होता. चालता चालता त्याचा तोल गेला. एवढ्यात त्याला कसलातरी आवाज ऎकु आला. तो खाली पडला, अजुनही तो असंबद्ध बडबड करत होता
            बेल वाजताच तीने धावत जावून दरवाजा ऊघडला. सुदामाला घरात घेत ती म्हणाली‘भाऊजी बघा हे कसे विचित्र ओरडतायत, तुमच्या नावाने शिमगा चाललाय,रोज कसली कसली स्वप्न पडतात कोण जाणे?’
             सुदाम्याने गदागदा हलवून त्याला जागे केले.तो प्रचंड घामाजलेला होता.थोडी जाग येताच त्याला समजेना आपण बघितले ते स्वप्न होते की स्वप्नातले स्वप्न, त्याची छाती  दडपून गेली होती, मात्र सुदाम्यावरील त्याचा राग अजुनही निवळला नव्हता. त्याच्याकडे बघताना त्याचे डोळे आग ओकत होते. सुदाम्याने शांतपणे त्याच्या हातात लाडू दिला व म्हणाला‘श्रीहरी तिळगुळ घे नी निदान आज तरी गोड बोल बाबा’ व आत मध्ये ऎकू जाइल एवढ्या आवाजात ओरडला ‘वहिनी ह्याच ब्लड्प्रेशर तपासा,आजकाल हा ऑफीसमध्येही अशिच चिडचिड करतो.’

           ‘होय हो भावोजी, आम्ही तर १६-१६ तास यांच्याबरोबर असतो, अहो!जागे व्हा!आटपा आता.चहा ठेवलाय.’ म्हणत रागारागाने ती स्वयंपाक घरात निघुन गेली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा