रविवार, २८ ऑक्टोबर, २०१२

कृतीहीन बंदी ........


   कृतीहीन बंदी ........

अश्रू भिजल्या कॅनव्हासवर ,
ते हिलस्टेशन रंगवत होते,
आम्ही कॅनव्हास कोरडे केले ,
बिचारे आमच्याचसाठी राबत होते ......
तोच स्टुडिओ,तेच रंग,
कलाकार बदलत होते,
पांढरा स्वच्छ ब्रश वापरत,
काळी सत्य दडवत होते .........
प्रत्येक चित्राला एकच नाव ,
नव्या युगाची नांदी,
हतबलतेच्या गजाआड,
आम्ही कृतीहीन बंदी,
     आम्ही कृतीहीन बंदी..........

गुरुवार, २५ ऑक्टोबर, २०१२

Roll Back And Down Sizing

रोल ब्याक डाऊन सायझिंग 
                     

        फार वर्षांपूर्वी साथी भाई वैद्य यांच्या पुस्तकात त्यांनी लिहिल होत की जागातीकीकरणामुळे सार्वजनिक उपक्रमामध्ये येवू घातलेली नवी प्रणाली म्हणजेच सरकारची रोल ब्याक डाऊन सायझिंग पौलीसी. याचाच अर्थ आरोग्य, शिक्षण, वीज, परिवहन इत्यादी सार्वजनिक क्षेत्रे यांचे हळूहळू खाजगीकरण करायचे आणि त्याचबरोबर त्या त्या उपक्रमातील कर्मचार्यांची संख्या कमी करायची व त्यांचे आकारमान कमी करावयाचे. दोन्ही गोष्टी लाखो कर्मचारी व सार्वजनिक उपक्रमांवर परिणाम करणार्या असल्यामुळे रोल ब्याक डाऊन सायझिंग हे दोन्ही शब्द मेंदूमध्ये घट्ट रुतून बसले होते, पण ह्या गोष्टीनी घरात कधी प्रवेश केला ते कळलेच नाही. 
     
     गावी रहाणारया काकांचा यंदा मे महिन्यात अपघात झाला. गणेशोत्सव जवळ आला तरीही ते व्यवस्थित स्वतःच्या पायावर उभे राहू शकत न्हवते. यंदा गणपती आणायचा कोणी इथपासून पूजा कोण करणार इथ पर्यंत सर्व प्रश्नांसहीत त्यांचे फोन वारंवार येत होते. मी सुद्धा सर्व चुलत भावाना कळविण्यास सुरुवात केली, अर्थात फेसबुक व फोन द्वारे. परिस्थितीचा अंदाज घेत ५ दिवसांचा रजेचा अर्ज करून ठेवला.

       चुलत भावांचा काहीच प्रोग्राम फिक्स होत न्हवता आणि अशातच गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी गावी जाण्यासाठी निघालो. निघतानाच तुमची रजा फक्त दोन दिवसांची मंजूर करण्यात आली आहे कुठल्याही परिस्थितीत तिसऱ्या दिवशी तुम्हाला हजर व्हावे लागेल हा ऑफिसचा फतवा मिळाला आणि माझ्या चिंतेत भर पडली , अर्थात विघ्नविनाशक बाप्पा यातून मार्ग काढतील या आशेवर गावी पोहचलो.
  
     गणपतीची आरास व पूजेची तयारी करून त्या दिवशी आम्ही झोपी गेलो. पहाटे पुण्याहून मोठा भावू, वहिनी व पुतण्या आले आणी घर भरू लागले. सर्वानी बाप्पाची मूर्ती घरी आणली. श्रींची पूजा चालू असताना रत्नागिरीहून आणखी एक भावू त्याच्या कुटुंबा बरोबर आला.आरती झाली आणी रत्नागिरीच्या भावाने सांगितले की तो लगेच परत जाणार आहे. सकाळपासून खुश असलेली गावातील चुलत बहीण थोडी हिरमुसली. पुण्याच्या भावालाही माझ्यासारखीच मोठ्या प्रयासाने दोन दिवसांची रजा मिळाली होती. संध्याकाळी आरती झाल्यावर सर्वानी परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी निर्णय घेतला की दीड दिवसांनी बाप्पाचे विसर्जन करायचे. दुपारपासून शांत असलेल्या बहिणीचे डोळे भरून आले.

      लहानपणी गणेशोत्सवामध्ये हेच घर भरलेले असायचे. आरत्या, मंत्रपुष्पांजली, सहस्त्रावर्तन, हास्यविनोद यांनी  ५ दिवस वेगळ्याच वातावरणाने भारलेले असायचे. त्याच घरात दीड दिवसांनी विसर्जन करण्याची वेळ यावी या विचाराने रात्रभर झोप लागली नाही.

     दुसऱ्या दिवशी सकाळची पूजा झाल्यावर विसर्जनाची जबाबदारी मोठ्या भावावर सोपवून परत निघालो. आजूबाजूची घरेही शांत होती. चौकशी केली असता बर्याच घरी कामाधन्द्याच्या व्यापामुळे चाकरमानी आलेच न्हवते, काही आहे तिथेच रमले होते, तर काही शहरातला उत्सव सोडून गावी यायला उत्सुक न्हवते. एकूण घरोघरी त्याच चुली.
      परत येताना हिरमुसलेला बहिणीचा चेहरा सारखा डोळ्यासमोर येत होता अन मनात विचार आला जागतिकीकरण, स्पर्धा,मनोरंजनाची नवनवीन साधने यामुळे नात्यातील आपलेपणाचा रोल ब्याक आणी कुटुंबाचे डाऊन सायझिंग तर व्हायला लागले नाही ना ?

गुरुवार, २७ सप्टेंबर, २०१२

प्रसाद ' रक्षण ' करता

                     प्रसाद ' रक्षण ' करता

            यावर्षी गणपती बाप्पाच्या तयारीसाठी आदल्या दिवशीच संध्याकाळी गावाला पोचलो. कधी एकदा घरी पोचतो नी मखराचे काम सुरु करतो असे प्रतीकला झाले होते. त्याने तात्काळ देवघराकडे धाव घेतली. आमचा आवाज ऐकला अन तो आला. त्याचा बाबाही असाच येत असे.

               गावात आता वीज आली होती. मुलाचं मखर बनवण चालू होत. त्यांच्या त्या गडबडीमध्ये तो मात्र समंजसपणे वावरत होता. प्रतीकची आवड सांभाळत उपलब्ध सामनामध्ये मखर अधिक आकर्षक कस करता येईल ते समजावत होता. त्याच्या मागोमाग त्याची म्हातारी आजी आली. आता तीलाच त्याला सांभाळाव लागत होत. लांब बसून ती नातवाला न्ह्याहाळत होती. एव्हड्यात वीज गेली अन सर्वत्र काळोख पसरला. मुल हिरमुसली, तो मात्र कंदील शोधू लागला. कदाचित परिस्थितीनेच आहे त्यातून मार्ग शोधण्याची नजर त्याला दिली असेल. एव्हड्यात त्याने आपल्या आजीला बघितले आणि म्हणाला ' आये ! पैसे देवून ठेव , प्रसादीला साखरफुटाणे आणतो '. म्हातारीने पटकन माझ्याकडे बघितले, त्या कंदिलाच्या प्रकाशात तिचे डबडबलेले डोळे मला दिसू नयेत म्हणून ती उठली आणी पडवीत झोपाळ्यावर जावून बसली. बरेच दिवस वंगण मिळालेला झोपाळा कर- कर आवाज करू लागला. त्या शांततेत ती झोपाळ्याची कर -कर मला भूतकाळात घेवून  गेली.
          ' आत्ता प्रतिक आणी तो जसे एकाच वयाचे तसेच त्याचा बाबा नाथा आणी मी. तोही त्यावेळी असाच पोरका. माझ्या लहानपणी गणपतीला गावी जायचे म्हणजे मोठी तयारी असायची. गावाचे घर बंद असायचे त्यामुळे किराणा सामान ते पूजा साहित्य सर्व बरोबर घ्यावे लागायचे. त्यात वाहतुकीचे साधन नाही त्यामुळे पायी प्रवास . तरीही मजा यायची. जमेल तेव्हडे ओझे घेऊन आम्ही गावी निघायचो . त्याची आई त्यावेळीही आम्हाला न्यायला - किलोमीटर चालत यायची. वाटेत प्रवासात हा मामाचा डोंगर हा भाच्याचा डोंगर , इथे मोर येतात अस जे जमेल ते दाखवत आम्हाला कंटाळा येणार नाही अशा गमती सांगायची. घरी येईपर्यंत संध्याकाळ व्हायची. गावी वीज न्हवतीच. त्यामुळे कंदिलाच्या प्रकाशात नाथा आणी मी मखर करायचो. त्याची आई चुलीवर कुळथाचे पिठलं करताकरता त्याला बघत असायची. मखर करताना मी कंटाळून झोपी जायचो पण सकाळी उठून बघाव तर माझ्या मनासारखे मखर तयार असायचे. त्यावेळी आजच्या सारखेच गाव चाकरमान्यांनी गजबजलेले असायचे. मात्र प्रत्येकाच्या घरात गणपतीच्या प्रसादाला हमखास एकच असे ते म्हणजे ' साखर फुटाणे'. ते मात्र मुठभर मिळत.
             दुपारच्या जेवणानंतर नाथा मला घेवून बाहेर पडे, आजूबाजूचे गणपती बघण्यासाठी. सोबत एक पिशवी. प्रत्येकाकडे मिळणारे साखर फुटाणे तो पिशवीमध्ये जमवत असे`. गणपती विसर्जन होई पर्यंत आमचा हा  दिनक्रम चाले. मलाही फिरायला मित्र असल्याने मी आनंदाने त्याच्या बरोबर जात असे. एके दिवशी दुपारी नाथा कडे गेलो. तो घरी न्हवता. त्याची आई चुलीवर पातेल ठेवून जवळच बसली होती. बहुतेक चहा करत असावी. मी नाथाची चौकशी केली अन सहज तिला विचारले ' मावशी नाथा रोज पिशवी भरून साखर फुटाणे गोळा करून काय करतो ?'
काही न बोलता डबडबलेल्या डोळ्यांनी तिने बोट केले . मी भिंतीवरचा अल्युमिनियमचा डबा काढला. तिने खुणावतच तो उघडला. तो साखर फुटाण्यांनी भरलेला होता. तिने झाकण लावले.
 ' सोन्या महागाई किती झालेय , थोडीशी चहा पावडर आणी चहाची गवती पात  जमते पण गुळ, साखर नको परवडायला?   दिवसभर पावसात रानामध्ये गुराढोरा मागे धावून घरी आल कि चहा प्यावीशी वाटते , पोर पण भिजून शाळेतून येतो त्याला पण द्यावीशी वाटते पण बिचारा मागत नाही . मग गणपतीतून हा असा दिवसभर वणवण फिरतो नि जमवतो साखर फुटाणे. निदान फुडचे दोन महिने तरी माझा चहा हे साखरफुटाणे घालून होतो '
        तिने पदराने चुलीवरचे पातेले उतरले अन मला च्या घे म्हणाली . मी तसाच धावत घरी आलो. त्या नंतर मी कधीच तो मरेपर्यंत त्याच्याशी भांडलो नाही , खेळताना सुद्धा .
        मी भानावर आलो तेव्हा झोपाळ्याची कर - कर थांबली होती , बहुतेक ती दोघ गेली असावीत. मात्र आजही कुठेही साखर फुटाणे मिळाले कि मी एखादा दाणा नाईलाजाने तोंडात टाकतो पण डोळ्यासमोर येतो अल्युमिनियमचा डबा..