
पणजी-पुणे सेमीलक्झरी नेहमीच्या वेळीच पुर्ण भरुन सुटली, अन गोव्याची मस्ती चेहऱ्यावर मिरवत गाडी प्रवास करू लागली.त्यात तोच एकटा वेगळा वाटत होता. सावंतवाडीच्या हॉटेलमध्ये गाडी थांबली. तो बिअर व सॅन्डविच फ़स्त करत होता व सहप्रवाश्यांपैकी नववधुही जोडिदाराची नजर चुकवून त्याचे गोरेपण न्याहाळत होत्या. तो दुसरा तिसरा कोणी नाही तर एक हिप्पी होता. जग भटकायला निघालेला एक बेदरकार प्रवासी.
गाडी कणकवलीला थांबली. एका लहान मुलाला घेउन एक महिला एकटीच बसमध्ये चढली. बसायला जागा न्हवतीच, वाहकाने सांगुनही ती जायलाच पाहिजे म्हणून उभी राहिली. पेंगुळलेल्या डोळ्यांनी सहप्रवासी तिच्याकडे बघत होते. तो खाली उतरुन शांतपणॆ सिगरेटचे झुरके घेत होता.बस सुरू झाली,कंडक्टरने तिला तिकीट दिले व तो आपल्या जागेकडे निघाला अन अचानक तो जाग्यावरुन उठला `एनीबडी ह्याव न्युजपेपर?”तो विचारु लागला.त्याच्या हालचाली न्याहाळणाऱ्यापैकी दोघा-तिघांनी त्यांच्याजवळची वर्तमानपत्र त्याला दिली. त्याने शांतपणे ते पेपर पॅसेजमध्ये पसरले,रॅकमधील आपली सॅक हातात घेतली व त्या महिलेला ”प्लीज सिट डाउन”म्हणत त्याने आपली जागा रिकामी करुन दिली व तो शांतपणे त्या पेपरवर सॅक उशाला घेउन झोपी गेला.ती स्त्री कोल्हापुरला उतरली तरी तो शांतपणे पॅसेजमध्ये झोपी गेला होता, निरागस मुलासारखा.
खरच मग सांगा माणुसकीला धर्म, देश अस काही असत? ती असते ह्लुदयात आणि वावरते माणसाच्या वर्तनामध्ये.
कोकणरेल्वे सूरु झाल्यापासून आम्ही रत्नांग्रीकर मुंबईला जाण्य़ाचे निमीत्त शोधत असतो. आधीच कोकणी माणूस आणि मुंबई यांच नात वेगळच आहे. नारळीपौर्णिमा दोन दिवसांवर आलेली, त्यात दोन दिवस सुट्टी अर्थात सुट्टी नसली तरी मी या दिवशी हटकून कोळीवाड्यात जातोच तसा या वर्षीही नीघालो होतो रत्नागिरी - दादर पॅसेंजरने.
एकतर तिकीट अगदीच कमी, त्यात आजुबाजुला गावची आपली माणस, बाहेर हिरवेगार कोकण आणि मध्येच सणसणत येणारी पावसाची सर जबरदस्त माहोल. खर तर प्रत्येकाने एकदातरी ह्या दिवसात या पॅसेंजरने प्रवास करावाच.एक एक स्टॆशन पुढे जात होतो.आपल्या मुंबईतल्या चाकरमान्याला सुके मासे,तांदूळ, हळद जे जमेल ते घेउन जो-तो मुंबईला निघाला होता.खेड स्टेशन गेले नी मी वाट पाहू लागलो. इथून गाडी भरते ती गावठी भाज्या विकणाऱ्या शेतकरी महिलांनी. वांगी, काकड्या, दूधी, मिरच्या सगळ्या टोपल्या भाज्यांनी भरलेल्या. मी ह्या सगळ्या भाज्या हटकून घेतो.त्या दिवशीही एकीला थांबवली. थोडी भाजी घेउन होतोय न होतेय तोवर एकदम पळापळ सुरू झाली. सर्व भाजी विकणाऱ्या महिला डोक्यावर टोपल्या घेउन धावू लागल्या.मी तीला काय झाले म्हणून विचारले तर म्हणाली" आधी पायाखाली टोपली लपवा, पास नाय ना,रेल्वेपोलीस आलेत."एवढ म्हणत ती धावत निघुन गेली. तेवढ्यात खरोखरच टी.सी. व रेल्वेपोलीस आले. इकडे-तिकडे तपासत निघून गेले. मी ती टोपली त्यांच्या नजरेला पडणार नाही याची पूरेपूर काळजी घेतली होती.डब्यात आता यावर चर्चाही सुरू झाल्या होत्या. अर्धा तास झाला असेल, मध्येच एक स्टेशनही येवून गेले, नी ती आली. थोडीशी घाबरलेली. "टोपली हाय ना?"मी खूणेनेच बाकड्याच्या खाली खूण केली व तीची टोपली बाहेर ओढली. ’लपलो होतो’,हे पोलीसवाले मध्येच कधीतरी येतात, सगळी भाजी टाकून देतात.काय करणार परमिशन नाय ना? रेल्वे झाली, भाजी विकून चार पैसे मिळायला तरी लागले.भाऊ तुम्ही मदत केलीत म्हणून माल तरी वाचला. मी घेतलेल्या भाजीचे पैसे विचारले तर म्हणाली’ थांबा एवढी भाजी विकून येते घेयाला.गाडी पूढे जात होती, थोड्याच वेळात पेण स्टेशन येणार तेवढ्यात आली व मला म्हणाली’ भाउ हात पुढे करा! मी भांबावून बघू लागलो तर म्हणाली’ पूढच्या डब्यात पुतण्या राख्या विकतोय त्याला शोधत होते, उंद्या राखी पौर्णिमेला तुम्ही भेटाल न भेटाल तेव्हा आजच बांधते.मी हात पुढे केला, तिने राखी बांधली.एक काकडी कापून मीठ टाकून देत म्हणाली’ मी सुनंदा, कासु गावची,भाउ या कधीतरी’ आणि बाहेरचा अंदाज घेत म्हणाली, पेण आल आता उतराया पाहिजे, डोक्यावर टोपली घेत निघुन गेली. मी ही नारळीपौर्णिमेच्या उत्साहात विसरून गेलो.
अनंतचतुर्दिशीला मुंबईला यावेळी गाडी घेउन निघालो होतो. हायवेने मस्त गाणी ऎकत जात असताना अचानक बोर्ड पाहिला’ कासु’ व गाडी थांबवली.डाव्या बाजुला ओळीने कौलारू घरे, भाताच्या मळ्या पहात होतो, ही आश्चर्याने म्हणाली’ काय रे कधी गाव पाहिले नाहिस का?’ मी उजव्या हातावरच्या धाग्याकडे बघत म्हट्ल’ ह्या गावात माझी बहिण राहते’ आणि स्वत:शिच हसलो.हिला कळलच नाही मी का हसतोय ते, पण गाडी सुरु करताना ठरवल एकदा तरी गावात जायच नी भेटायच माझ्या बहिणीला अर्थात "सुनंदाला".
गुहागर _ अक्कलकोट गाडी धावतच पकडली . आड्व्या सिटवर जागाहि मिळाली.समोर सर्व सीट्स जवळपास भरलेल्या.बरेच जण माझ्याकडॆ बघून नमस्कार करत होते. अश्या अनोळखी व्यक्ती नमस्कार का करतात म्हणून मी गोंधळून आजुबाजुला बघितले तर लक्श्यात आले की डॊक्यावर स्वामी समर्थांचा फोटो होता व सर्वजण त्याला नमस्कार करत होते.फोटो बघितला, कोणीतरी सप्रेम भेट दिला होता व त्याखाली लिहले होते कॄष्णमुर्ति ज्योतिषि, सर्व समास्यांचॆ निवारण करुन दिले जाईल व त्याखाली स्वत:चा फोन नंबर दिला होता. समर्थांचा फोटो भेट देवून स्वत:चीच जाहिरात जास्त केली होती.
आजकाल हा ट्रेंड्च झालाय़. प्रत्येक भेट ही व्यावाहारिक झालॆय़. वर्तमानपत्रात रोज कोणाची ना कोणाची तरी बातमी येत असते ,मोफत वही वाटप, मोफत फळे वाटप, वाढदिवसाबद्दल देणगी वगैरे पण त्यात देणाऱ्याचा फोटोच मोठा असतो. अश्या अनेक भेटींमागे कारणे वेगळीच असू शकतात, अन्यथा त्याची जाहिरात करण्याची गरज का भासावी? शुभ प्रसंगी दिल्या जाणाऱ्या भेटींचेही हिशोब ठेवून त्याचा परतावा केला जातो. याला सप्रेम भेट म्हणायचे का?
मोठया माणसांचे राहू दे, गेल्याच महिन्यात माझा मुलगा प्रतिक ह्याचा वाढदिवस होता,त्याच्या खरेदीसाठी गेलो असता म्हणाला‘बाबा गिफ़्ट शॉपीमध्ये चला!’ मी कशाला म्हणून विचारले, तर म्हणाला" रिटर्न गिफ़्ट घ्यायचे आहेत. मी कशाला विचारले तर म्हणाला जस्ट फ़ॉरमॅलिटिज अस काहिस बडबडला. गिफ़्ट लगेच परत करायचे असते हे पूढ्च्या पिढीतही रुजू लागलेय. यावरुन भावनेपेक्षा व्यावहारिकता जास्त महत्वाची ठरतेय अस म्हणायचे का? कदाचित म्हणूनच आजकाल भेटीबरोबर सप्रेम भेट न म्हणता शुभेच्छापूर्वक असच जास्त म्हटल जात नसेल?