सोमवार, ३ ऑक्टोबर, २०१६

दुर्गा


' मुझे कुछ बोलना है मगर मुझे बोलने की आदत नही' हे शब्द आहेत, नाव दुर्गा गुडीलू राहणार मुंबईतील 14 वैदू समाजाच्या वस्तीमधील एक वस्ती आणि  हिचे त्यावेळी तिचे वय असेल 13 वर्षे ....
             ' शिका आणि संघटित व्हा ' हा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार आचरणात आणत उपेक्षित वैदू समाजाच्या प्रष्णांना भिडणारी आधुनिक 'दुर्गा' . दुर्गा आज मुंबईतील 14 वस्त्या व महाराष्ट्रातील विखुरलेल्या 60 ते 70 वस्त्या यासोबत काम करत आहे . वैदू समाजातील एकही मुल शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून धडपडत आहे. याच बरोबर रचनात्मक कामावर भर देत वैदू समाजातील; बंधू भगिनींचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न करत आहे . 
              ह्या सर्वाची सुरुवात मात्र झाली ती एका संघर्षातून , जेव्हा तिच्या कुटुंबाला जात पंचायतीने वाळीत टाकले .त्या वेळी ती अवघी 13 वर्षांची असेल . वाळीत टाकण्यासाठी कारण कोणते तर तिची मोठी बहीण  गोविंदी हिचे तत्कालीन प्रथेप्रमाणे गर्भातच लग्न ठरले होते मात्र गोविंदी ही समाजातील पहिली उच्चशिक्षित मुलगी तिने या लग्नाला विरोध केला आणि प्रकरण जात पंचायतीकडे गेले . जातपंचायतीने हे लग्न वैध ठरविले मात्र हा निर्णय मान्य नसल्याने संपूर्ण कुटुंबाला वाळीत टाकण्यात आले. यावेळी गोविंदी आणि तिच्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीर उभी राहिली तिची लहान बहीण 'दुर्गा'
  तिने जात पंचायतीच्या निर्णयाला आव्हान दिले. जात पंचायतीमध्ये स्त्रियांना अत्यंत दुय्यम स्थान दिले जात असे ,स्त्रियांना आपली सत्यता पटविण्यासाठी उकळत्या तेलात हात बुडवणे या सारख्या अघोरी प्रकाराला सामोरे जावे लागे. जात पंचायतीद्वारे ठरविण्यात आलेली दंडाची रक्कम कुवतीच्या बाहेरची असे या सर्वा विरुद्ध लढत तिने एक आंदोलन उभे केले व जात पंचायतीचे विकास समिती मध्ये रूपांतर करण्यात महत्वाची भूमिका निभावली.
            या तिच्या कामाची दखल म्हणजे अवघ्या 14 व्या वर्षी ब्राझील मध्ये झालेल्या जागतिक सामाजिक परिषदेमध्ये तिने  प्रतिनिधित्व करत 'भटक्या व विमुक्त समाजातील मुलांच्या समस्यां' मांडल्या.
            आज स्वयं संघर्ष सामाजिक संस्था या संस्थेची ती अध्यक्ष असून सुई , बिब्बा  , फणी यासारख्या वस्तू विकून जीवन जगणाऱ्या महिलांना एकत्र करत तिने 18 बचतगट स्थापून कुटुंबाकरिता बचत व त्यातून उत्कर्ष असा सबलीकरणाचा मार्ग दाखवत स्त्री सक्षमीकरणाचा एक आदर्श उभा केला आहे .
या स्त्रियांच्या आयुष्यात काही आनंदाचे क्षण यावेत या साठी ती वेगवेगळे उपक्रम राबवत असते , नुकतीच तीने  या महिलांना मॉलची सफर ही घडवून आणली .
           जातिप्रथेतील अनिष्ट रुढींवर प्रतिकूल परिस्थितीवर मात करून प्रहार करणाऱ्या आधुनिक दुर्गाला सलाम ........




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा