शुक्रवार, ५ जून, २०२०

एक तुटत चाललेले नाते

लहानपण संगमेश्वर तालुक्यातील एका खेडेगावामध्ये गेले. त्यावेळी तिथे वीज पोचली नव्हती , सूर्या बरोबर प्रकाशाचा स्रोत लुप्त व्हायचा आणि मग कंदील सोबत देऊ लागायचा. आजीच्या खोलीमध्ये आजी बाजल्यावर असायची , वातावरण इतके शांत असायचे की बाहेरील पक्ष्याचे आवाज स्पष्ट ऐकू यायचे. मग आजी या आवाजावरून गोष्टी तयार करून ऐकवायची यात त्या पक्ष्याचे आणि प्राण्यांची मैत्री, गमती अस बरच असायचं . मग दुसऱ्या दिवशी चिमण्या , कावळे , खारुताई दिसली की गोष्टीतील गमती डोळ्यासमोर यायच्या. कधी कधी शेणाचे आणि मेणाचे घर शोधत अनेक झाडे चारही दिशानी बघून व्ह्यायची. 
कोनाड्यात दिवा ठेवताना अलगद चूक चूक आवाज त्या मोठ्या घरात ऐकू यायचा ,मग पालीचा शोध सुरू व्हायचा . खरच असा आवाज येतो का? बघा मनात शंकेची पाल चुकचुकली ना? 
जेवणाच्या वेळी काका , दादा दिवसभरातील अनेक घटना एकमेकांना सांगायचे यात खैर, किंजळ, आईनं अशी झाडे तर लांडोर ,मोर अश्या प्राण्यांचे वर्णन असायचे . घराच्या बाहेर पडले की नारळ , पोफळीची झाडे , आमराई असे पर्यटन सहज घडत जायचे . पाटाच्या पाण्याचा मार्ग फिरवता फिरवता मुंग्या दिसायच्या. मग त्यांची रांग शोधत त्यांच्या घरांचा शोध घ्यायचा प्रयत्न व्ह्यायचा. 
मग तालुक्याच्या ठिकाणी आलो आणि पहिल्यांदा विजेचे दिवे बघितले , सूर्या नंतरच प्रकाश आला आणि अंधारातल्या आजीच्या गोष्टी मागे राहिल्या. सुट्टीत गावाला जाताना मात्र मौज असायची. साधारण नऊ ते दहा किलोमीटर चे अंतर मात्र प्रवास पायी पायी . रस्ता नव्हता त्यामुळे एस टी नाही की गाडी नाही. मग चालत चालत जाताना आमचे थांबे ठरलेले असायचे . वाटेत समोरासमोर दोन डोंगर लागायचे , त्याला मामा भाच्याचे डोंगर म्हटले जायचे , मग एक छोटा ओहळ लागायचा त्याला चिंचेचा पऱ्या म्हणत असत. कोकणात लहान ओढ्याला पऱ्या म्हणतात. तिथे आजूबाजूला छान झाडी होती , सकाळो लवकर निघालं तर पोपटाचे थवे तिथे असायचे . डोंगरातून चालताना माझा गावातील मित्र किती गोष्टी सांगायचा. 
श्रावणात शिखरावर शंकराच्या देवळात जाताना बेलाची झाडे लागायची. ओढ्यात पाय धुवून पुढे जाताना तो वाहत्या पाण्याचा स्पर्श ,गंमत वाटायची . 
मग गाड्या सुरू झाल्या, टी व्ही आले , विडिओ सेंटर वरती चित्रपट  ,  मग दुचाकी आली , गावचे अंतर वाढले ,वेळेच्या गणितात आपल्या गाडीने प्रवास सुरु झाला आणि हे सारे तुटत गेले. 
अरे या तुटण्याला किंती सहज मी या वस्तुंना जबाबदार धरले? 
या असतानाही मी हे नाते टिकऊ शकलो असतो हे गेल्या काही दिवसात अधोरेखित झाले पण सवय काय करणार तेव्हा या गोष्टी आल्या आणि एक नाते तुटत गेले...
संतोष पुरोहित 
जागतिक पर्यावरण दिन 2020

सोमवार, ३ ऑक्टोबर, २०१६

दुर्गा

' मुझे कुछ बोलना है मगर मुझे बोलने की आदत नही' हे शब्द आहेत, नाव दुर्गा गुडीलू राहणार मुंबईतील 14 वैदू समाजाच्या वस्तीमधील एक वस्ती आणि  हिचे त्यावेळी तिचे वय असेल 13 वर्षे ....
             ' शिका आणि संघटित व्हा ' हा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार आचरणात आणत उपेक्षित वैदू समाजाच्या प्रष्णांना भिडणारी आधुनिक 'दुर्गा' . दुर्गा आज मुंबईतील 14 वस्त्या व महाराष्ट्रातील विखुरलेल्या 60 ते 70 वस्त्या यासोबत काम करत आहे . वैदू समाजातील एकही मुल शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून धडपडत आहे. याच बरोबर रचनात्मक कामावर भर देत वैदू समाजातील; बंधू भगिनींचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न करत आहे . 
              ह्या सर्वाची सुरुवात मात्र झाली ती एका संघर्षातून , जेव्हा तिच्या कुटुंबाला जात पंचायतीने वाळीत टाकले .त्या वेळी ती अवघी 13 वर्षांची असेल . वाळीत टाकण्यासाठी कारण कोणते तर तिची मोठी बहीण  गोविंदी हिचे तत्कालीन प्रथेप्रमाणे गर्भातच लग्न ठरले होते मात्र गोविंदी ही समाजातील पहिली उच्चशिक्षित मुलगी तिने या लग्नाला विरोध केला आणि प्रकरण जात पंचायतीकडे गेले . जातपंचायतीने हे लग्न वैध ठरविले मात्र हा निर्णय मान्य नसल्याने संपूर्ण कुटुंबाला वाळीत टाकण्यात आले. यावेळी गोविंदी आणि तिच्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीर उभी राहिली तिची लहान बहीण 'दुर्गा'
  तिने जात पंचायतीच्या निर्णयाला आव्हान दिले. जात पंचायतीमध्ये स्त्रियांना अत्यंत दुय्यम स्थान दिले जात असे ,स्त्रियांना आपली सत्यता पटविण्यासाठी उकळत्या तेलात हात बुडवणे या सारख्या अघोरी प्रकाराला सामोरे जावे लागे. जात पंचायतीद्वारे ठरविण्यात आलेली दंडाची रक्कम कुवतीच्या बाहेरची असे या सर्वा विरुद्ध लढत तिने एक आंदोलन उभे केले व जात पंचायतीचे विकास समिती मध्ये रूपांतर करण्यात महत्वाची भूमिका निभावली.
            या तिच्या कामाची दखल म्हणजे अवघ्या 14 व्या वर्षी ब्राझील मध्ये झालेल्या जागतिक सामाजिक परिषदेमध्ये तिने  प्रतिनिधित्व करत 'भटक्या व विमुक्त समाजातील मुलांच्या समस्यां' मांडल्या.
            आज स्वयं संघर्ष सामाजिक संस्था या संस्थेची ती अध्यक्ष असून सुई , बिब्बा  , फणी यासारख्या वस्तू विकून जीवन जगणाऱ्या महिलांना एकत्र करत तिने 18 बचतगट स्थापून कुटुंबाकरिता बचत व त्यातून उत्कर्ष असा सबलीकरणाचा मार्ग दाखवत स्त्री सक्षमीकरणाचा एक आदर्श उभा केला आहे .
या स्त्रियांच्या आयुष्यात काही आनंदाचे क्षण यावेत या साठी ती वेगवेगळे उपक्रम राबवत असते , नुकतीच तीने  या महिलांना मॉलची सफर ही घडवून आणली .
           जातिप्रथेतील अनिष्ट रुढींवर प्रतिकूल परिस्थितीवर मात करून प्रहार करणाऱ्या आधुनिक दुर्गाला सलाम ........

गुरुवार, १५ सप्टेंबर, २०१६

अभियंता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा .......
सकाळपासून शुभेच्छांची देवाण घेवाण चालू आहे , पण आज आवर्जून अभिनंदन करावं ,सलाम करावा असं ज्यांच्या बाबतीत  मनापासून वाटलं ते शब्दात मांडण्याचा प्रयत्न करतोय. अभियंतांत्रिकी   ही एक जिज्ञासा , प्रयोगशीलता व चिकाटी यातून घडत जाणारी सतत नाविन्याचा ध्यास असलेली प्रक्रिया आहे . ग्रामीण भागामध्ये कोणतेही औपचारिक शिक्षण नसतानाही अनेक प्रयोगशील व्यक्ती नवं नवीन शोध लावून आपले व समाजाचे जीवन सुखकारक करत असतात त्यांची दाखल घेतली जातेच असं नाही पण सध्या सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून अश्या अनेक प्रयोगांना प्रसिद्धी मिळून ते आपल्यासमोर येत आहेत .
           हे सगळं घडण्यासाठी आवश्यक असते ते मुक्त वातावरण , योग्य मार्गदर्शन व प्रोत्साहन. आजच्या बंदिस्त शिक्षण पद्धतीमध्ये लहानपणापासून एक साचेबंद आकृतिबंदातलेच शिक्षण मिळत असल्याने प्रयोगशीलतेला पुरेसा वाव मिळत नसावा पण काही प्रयोगशील संस्था ह्या जिज्ञासेला सकारात्मक प्रोत्साहन देऊन एक नवीन पिढी घडवत आहेत. 

1) बिन भिंतीची शाळा अर्थात school without wall हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील धामापूर या अतिशय निसर्ग सौन्दर्याने नटलेल्या गावामधील प्रयोगशील उपक्रम . इथे सगळेच विद्यार्थी , एक मेकांना सहकार्य करत चर्चा  करत ,आवश्यक ती माहिती गोळा करत इथे नवं निर्मिती केली जाते .इथे राहणारा मोहम्मद शेख याने सहज तयार करता येईल व जोडता येईल अशी पम्पिंग सिस्टीम तयार केली जिला ‘innovation star award’.ने गौवरवण्यात आलं . या उपक्रमाची दखल खुद्द बिग बी नी घेतली व आज की रात जिंदगी या कार्यक्रमामध्ये या टीमचा इंटरव्यू घेऊन गौरव केला.

येथील काही प्रयोगशील  उपक्रम 

Kitchen waste Bio Gas unit
Carbon credits are awarded to students for saving L.P.G. gas and electricity. In order to save L.P.G. gas students made a low-cost biogas system from kitchen waste.

Production of coal from Biomass 
Students gave free of charge hygiene service to the nearby primary school. School serves mid-meal to the children. This facilitated students to collect additional kitchen waste and produce more gas.

A simple water pumping system made by Mohammad Sheikh for which he received an ‘innovation star award’.
Water supply for agriculture activities was major problem. In order to transfer water from the near by well Mohammad Shaikh developed a simple mechanism using rubber visors (made from cycle tube) and a pvc pipe.
  
गोवा किंवा सिधुदुर्ग येथे जाणार असाल तर येथे अवश्य भेट द्या , पत्ता खालील प्रमाणे 

SYAMANTAK (स्यमंतक)
163,At post Dhamapur,Tal.Malvan,Dist.Sindhudurg.Pin:416605,Maharashtra,INDIA.
Ph: + 91-2365-255 620, + 91-94041-64945. +91-9405632848, Email: 163dhamapur@gmail.com

LOCATION OF SYAMANTAK, "University of Life"
Village: Dhamapur, Tehsil: Malvan, District: Sindhudurg, State: Maharashtra, Country: India
.
2) प्रयोगभूमी : वंचित मुलांचा प्रयोगशील शैक्षणिक उपक्रम 
16 वर्षे येथे शिक्षणापासून वंचित मुलांना निवासी शैक्षणिक व्यवस्था केली गेली आहे .येथेही मुलांना त्यांच्या पारंपारिक कला जोपासत नवं नवीन प्रयोगशील शिक्षण मिळेल हे पाहिले जाते , शालेय अभ्यास क्रमाबरोबर येथे अनेक तांत्रिक शिक्षण ही मिळते , वाहत्या पाण्यावर सूक्ष्म जल विद्युत निर्मिती करणारे जनित्र इथली मुले सहज जोडणी करतात .याच बरोबर पर्यावरणपुरक उपक्रम राबविले जातात .

इथला पत्ता , प्रयोगभूमी , कोळकेवाडी  , तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी 
संपर्क राजन इंदुलकर : 9423047620

आजच्या या अभियंता दिनाच्या निमित्ताने या प्रयोगशील उपक्रमांना सलाम .......

शनिवार, २७ ऑगस्ट, २०१६

अनंत गुंफणारे हात.....

काही वर्षे झाली मी त्यांच्याकडे गेलो न्हवतो. काही दिवसांपूर्वी रत्नागिरीला जाताना माझ्या गाडीपुढे एक  टेम्पो होता त्यावर लिहिले होते गणपतीची गाडी, बाप्पा पेणहुन निघाले होते .तो टेम्पो बघितला व ठरवले या वर्षी त्यांच्याकडे जायचेच.
      दुसऱ्या दिवशी दुकानाजवळ गेलो, रत्नागिरी बाजारपेठेच्या मुख्य नाक्यावर त्यांचं दुकान, दुकानांमध्ये ते दिसले नाहीत .मला वाटले बऱ्याच वर्षांनी आल्याने कदाचित मी चुकलो असेंन म्हणून दुकानाची पाटी बघितली, नाव तेच होत फक्त कालानुरूप बदल होत फ्लेक्सचा बोर्ड होता व सोबत मोबाइल नंबर. दुकानात एक युवक तन्मयतेने मंगळसूत्र गुंफत होता . समोर बसलेल्या गृहिणी सांगतील तसे मणी तो गुंफित होता, मी थांबून राहिलो, त्या गेल्यावर मी चौकशी केली ,नेहमी दुकानात असतात ते चाचा कुठे आहेत .मला त्यांच्याशी अनंताबद्दल थोडं बोलायचं आहे.तुम्हाला पूजेबद्दल माहिती हवी असेल तर पुजारी गुरुजींना विचारा तो म्हणाला . मी म्हटलं नाही मला चाचांशी ते अनंत कसे बनवतात त्याबद्दल बोलायचं आहे . हसत हसत तो म्हणाला ते दुपारी येतात ,मी त्याला दुसऱ्यादिवशी येतो सांगून घरी गेलो

  लहानपणापासून पासून मी बाबांबरोबर किंवा कधी कधी एकटा त्यांच्या दुकानात जात असे.कधी मोठा भाऊ घेऊन ठेवायचा पण  गणपती जवळ आले की घरी अनंत आणून ठेवायचा हे ठरलेलं . अनंत चतुर्दशीला ह्याची पूजा केली जाते ,वर्षानुवर्षे हे चालु आहे . दुसऱ्यादिवशी दुपारी माझे मित्र वल्लभ वणजु यांना घेऊन गेलो , चाचा दुकानात छत्री दुरुस्त करत बसले होते , दुकान आतून तसेच होते जसे मी लहानपणापासून पाहात आलो होतो . पूर्वी स्टोव्ह दुरुस्तीचे सामान जास्त असायचे .खूप मोकळेपणाने ते बोलू लागले, दुकानात बसलेला तो हसऱ्या चेहऱ्याचा युवक त्यांचा मुलगा अफझल, चाचांच नाव अल्ली अब्दुल रहीम पटवी , अफझल ही त्यांची चौथी पिढी.देवाचे दागिने, मंगळसूत्र , गणपतीचे गोंडे , पुतळ्या हे बनवणारे म्हणून त्यांचं आडनाव पटवी . अफझल खर तर महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झालेला ,त्याला बोटीवर किंवा आखाती देशात सहज नोकरी मिळाली असती, त्याचे समवयस्क जसे नोकरीसाठी आहेत तसे जाता आले असते पण ही पारंपारिक कला शिकून घेत तो स्वतः आज हा व्यवसाय चाचाना मदत करत चालवत आहे. 
चाचा सांगत होते ,पूजेसाठी बनवण्यात येणारा अनंत म्हणजे अनंत व अनंती अशी जोडी असते, तो पूर्ण रेशमाच्या धाग्यापासून विणला जातो .एक अनंत करायला साधारण 2 तास लागतात .एव्हड नाजूक काम असलेल्या अनंताची किंमत किती हे मी विचारल्यावर ते हसत म्हणाले 30 रुपये फक्त , हे मो परवडत म्हणून करत नाही तर एक परंपारा म्हणून आम्ही करतो, खूप नाजूक काम असल्याने ते शांतपणे घरी करावे लागते, आजूबाजूच्या 40 कि मी परिघातील हे व्रत करणारे त्यांच्याकडून अनंत घेऊन जातात व ते करून ठेवणार या खात्रीने येत असतात. साधारण 50 ते 60  घरांमध्ये चाचानी केलेले अनंत श्रद्धेने पुजले जातात. आजकालच्या मुलांना माहित नसल्याने अनंताला असलेल्या 14 गाठी चाचा तो बांधून देताना प्रत्येकाला मोजून बघायला सांगतात.
कालानुरूप बदलत आता जोडीला छत्रि दुरुस्ती सारखे जोड धंदा करत पिढ्यानपिढ्याची कला संवर्धन करणाऱ्या अफझलला व चाचाना सलाम !
    इदीचा शिरकुर्मा हा आमच्यासाठी प्रसाद असतो व चाचानी गुंफलेला रेशमी धागा आमच्यासाठी अनंत असतो हीच खरी आमची संस्कृती आहे . सणातून स्नेह व बंधुत्व वृद्धिंगत होवो हीच प्रार्थना .....
 
सोमवार, १४ जुलै, २०१४

बुध्या ....

बुध्या ....

त्याचे नाव बुध्या ... व्यवसाय : दारूसाठी वाट्टेल ते
     आज अचानक आठवला ,बहुतेक रस्त्याकडेला धो धो पावसात पडलेला दारुडा पाहून असेल कदाचित.उंच ,शिडशिडीत बुध्या लहानपणी देवरुखला आम्हा साऱ्याना  एक स्टार वाटायचा. जे काम आमच्या दृष्टीने हिरो असलेल्यांना जमायचे नाही ते बुध्या सहज करायचा. कोणाच्या आवारात साप आला तर बुध्याला बोलवा तो हमखास पकडणार . उंच झाडावर मधमाश्या दिसल्या तर बुध्या ते पोळ काढून देणार. पण त्याची खासियत होती ती पोहण्यामध्ये. प्रत्येकाच्या घराजवळील विहीर साफ करायची असेल तर ती कितीही खोल असुद्या फक्त बुध्या तिच्यात उतरायचा. त्यामुळे रहाटाला लावलेली तांब्याची कळशी जर विहिरीमध्ये पडली तर त्याच्याशिवाय पर्याय न्हवता . बरेचदा तो इमानदारीमध्ये ती काढून द्यायचा  हा त्या बदल्यात त्याची दोन तीन दिवसांची दारूची सोय  एव्हडीच त्याची माफक अपेक्षा असे . पण काही वेळा नुसतीच ती शोधल्याच तो सोंग करायचा आणि रात्रीमध्ये पुन्हा उडी मारून ती काढायचा.आणि मिळेल त्या किमती मध्ये मोड घालून विकून टाकायचा. अशा वेळी हमखास फायदा व्हायचा तो भांडीवाल्या रम्याचा . कळशी हरवलेला सुद्धा रम्याकडे जावून थोडेफार पैसे जादा देवून ती पुन्हा घरी आणायचा.
      एके दिवशी आईने मला बुध्याला बोलावून आणायचे फर्मान सोडले मी ओळखले बहुदा कळशी विहिरीमध्ये पडली असावी. तसे बुध्याचे घर कुणालाच ठावूक न्हवतॆ पण तो सापडण्याची हमखास ठिकाणे होती. मी त्याला शोधून निरोप दिला. 'बावा तू फुढ हो मी आलोच ' म्हणत बुध्याने मला हाकलले. थोड्याच वेळात तो आमच्या इथ हजर झाला. आईने त्याला चहा विचारला तर गालात हसत म्हणाला 'वयने कोरा च्या घेवून आलोय, जावूदे का बोलावलस ,कलशी पडली कि काय ?' आईने त्याला खुणेनेच बसायला सांगितले म्हणाली 'बुध्या कळशी असती तर एव्हड वाटलं नसत पण पाणी काढताना बोटातील सोन्याची अंगठी पडली.' तोंडाने चुक चुक आवाज करत बुध्या' वयने काय काळजी करू नकोस आत्ता काढून देतो ' म्हणत विहिरीकडे निघाला. अंगावरचा शर्ट उतरवून बुध्याने विहिरीमध्ये उडी घेतली ,तो पर्यंत आईची सोन्याची अंगठी विहिरीमध्ये पडल्याचे कळल्याने विहिरी भोवती वाड्यातील सर्व जमले. मध्येच बुध्या तळाशी जावून पाण्याच्या वर येई तसे आम्ही बुध्या सापडली का रे ?विचारात होतो तो खुणेनेच नाही म्हणत पाण्यात परत जात होता. तीन चार वेळा असे झाल्यावर बुध्या पाण्यावर आला तो हातात तांब्याची कळशी घेवून. त्याने रहाटाची दोरी खाली सोडायला सांगितली त्याला बांधून ती कळशी आम्ही वर घेतली. आणखी दोन प्रयत्न करून बुध्या वर आला 'वयने नाय बा दिसत, खाली चिखल पण हाय ,पण ती कळशी कोणाची असेल त्याला दे हो ' म्हणत कपडे घालून निघून गेला.
        दुसरा दिवस रविवार ,सकाळ सकाळी बुध्या हजर झाला तो कोरी च्या पिवूनच. 'वयने खर सांग तुझी सोन्याची अंगठी विहिरीमध्ये पडली होती ?' आईने हसतच विचारले 'म्हणजे काय बुध्या पण कारे ?' तसा  'नाय सहजच' म्हणत तो निघाला तसे त्याला आईने थांबवले कळशी काढल्या बद्दल पैसे दिले म्हणाली 'बुध्या सोन्याच्या अंगठीसाठी रात्रभर विहीर ढवळत होतास ना ?' गालातल्या गालात हसत बुध्या म्हणाला'वयने बुध्याला चांगलाच धडा शिकवलास, चल येतो' 
      तेव्हा पासून बाकिच्यांच माहीत नाही पण आमच्या वाड्यात बुध्याने इमानदारीने विहिरीतील वस्तू काढून दिल्या.