सोमवार, १४ जुलै, २०१४

बुध्या ....

बुध्या ....

त्याचे नाव बुध्या ... व्यवसाय : दारूसाठी वाट्टेल ते
     आज अचानक आठवला ,बहुतेक रस्त्याकडेला धो धो पावसात पडलेला दारुडा पाहून असेल कदाचित.उंच ,शिडशिडीत बुध्या लहानपणी देवरुखला आम्हा साऱ्याना  एक स्टार वाटायचा. जे काम आमच्या दृष्टीने हिरो असलेल्यांना जमायचे नाही ते बुध्या सहज करायचा. कोणाच्या आवारात साप आला तर बुध्याला बोलवा तो हमखास पकडणार . उंच झाडावर मधमाश्या दिसल्या तर बुध्या ते पोळ काढून देणार. पण त्याची खासियत होती ती पोहण्यामध्ये. प्रत्येकाच्या घराजवळील विहीर साफ करायची असेल तर ती कितीही खोल असुद्या फक्त बुध्या तिच्यात उतरायचा. त्यामुळे रहाटाला लावलेली तांब्याची कळशी जर विहिरीमध्ये पडली तर त्याच्याशिवाय पर्याय न्हवता . बरेचदा तो इमानदारीमध्ये ती काढून द्यायचा  हा त्या बदल्यात त्याची दोन तीन दिवसांची दारूची सोय  एव्हडीच त्याची माफक अपेक्षा असे . पण काही वेळा नुसतीच ती शोधल्याच तो सोंग करायचा आणि रात्रीमध्ये पुन्हा उडी मारून ती काढायचा.आणि मिळेल त्या किमती मध्ये मोड घालून विकून टाकायचा. अशा वेळी हमखास फायदा व्हायचा तो भांडीवाल्या रम्याचा . कळशी हरवलेला सुद्धा रम्याकडे जावून थोडेफार पैसे जादा देवून ती पुन्हा घरी आणायचा.
      एके दिवशी आईने मला बुध्याला बोलावून आणायचे फर्मान सोडले मी ओळखले बहुदा कळशी विहिरीमध्ये पडली असावी. तसे बुध्याचे घर कुणालाच ठावूक न्हवतॆ पण तो सापडण्याची हमखास ठिकाणे होती. मी त्याला शोधून निरोप दिला. 'बावा तू फुढ हो मी आलोच ' म्हणत बुध्याने मला हाकलले. थोड्याच वेळात तो आमच्या इथ हजर झाला. आईने त्याला चहा विचारला तर गालात हसत म्हणाला 'वयने कोरा च्या घेवून आलोय, जावूदे का बोलावलस ,कलशी पडली कि काय ?' आईने त्याला खुणेनेच बसायला सांगितले म्हणाली 'बुध्या कळशी असती तर एव्हड वाटलं नसत पण पाणी काढताना बोटातील सोन्याची अंगठी पडली.' तोंडाने चुक चुक आवाज करत बुध्या' वयने काय काळजी करू नकोस आत्ता काढून देतो ' म्हणत विहिरीकडे निघाला. अंगावरचा शर्ट उतरवून बुध्याने विहिरीमध्ये उडी घेतली ,तो पर्यंत आईची सोन्याची अंगठी विहिरीमध्ये पडल्याचे कळल्याने विहिरी भोवती वाड्यातील सर्व जमले. मध्येच बुध्या तळाशी जावून पाण्याच्या वर येई तसे आम्ही बुध्या सापडली का रे ?विचारात होतो तो खुणेनेच नाही म्हणत पाण्यात परत जात होता. तीन चार वेळा असे झाल्यावर बुध्या पाण्यावर आला तो हातात तांब्याची कळशी घेवून. त्याने रहाटाची दोरी खाली सोडायला सांगितली त्याला बांधून ती कळशी आम्ही वर घेतली. आणखी दोन प्रयत्न करून बुध्या वर आला 'वयने नाय बा दिसत, खाली चिखल पण हाय ,पण ती कळशी कोणाची असेल त्याला दे हो ' म्हणत कपडे घालून निघून गेला.
        दुसरा दिवस रविवार ,सकाळ सकाळी बुध्या हजर झाला तो कोरी च्या पिवूनच. 'वयने खर सांग तुझी सोन्याची अंगठी विहिरीमध्ये पडली होती ?' आईने हसतच विचारले 'म्हणजे काय बुध्या पण कारे ?' तसा  'नाय सहजच' म्हणत तो निघाला तसे त्याला आईने थांबवले कळशी काढल्या बद्दल पैसे दिले म्हणाली 'बुध्या सोन्याच्या अंगठीसाठी रात्रभर विहीर ढवळत होतास ना ?' गालातल्या गालात हसत बुध्या म्हणाला'वयने बुध्याला चांगलाच धडा शिकवलास, चल येतो' 
      तेव्हा पासून बाकिच्यांच माहीत नाही पण आमच्या वाड्यात बुध्याने इमानदारीने विहिरीतील वस्तू काढून दिल्या.