रविवार, ४ सप्टेंबर, २०११

‘इथे इथे काय?’- ‘उदंड’

                                   ‘इथे इथे काय?’- ‘उदंड’
 लहानपणी घरात गणपतीबाप्पा असताना हमखास माझे आणि आईचे भांडण होत असे.माझ्या सगळ्या मित्रांकडच्या गौरी कशा छान असायच्या. सुंदर मुखवटा,त्याला छान साडी नेसवलेली असायची.आपापल्या कुवतीप्रमाणे दागीने मढवलेले असायचे. आमच्याकडे मात्र खड्यांच्या गौरी आणायची प्रथा आहे.
 घरात पहाटेपासुन गौरी घरात आणायची तयारी सुरू होत असे. आई,काकू,आत्या यांची पहाटेपासून गडबड चालू असे. सर्व घर शेणाने सारवले जाई. सर्व खोल्यांमध्ये छान रांगोळीने लक्ष्मीची पावले काढली जात. सर्व तयारी पुर्ण झाल्यावर झांज,टाळ,ढोलकी आणि पुजेचे साहित्य घेउन आम्ही  विहीरीकडे जात असू. गौरी आणण्यासाठी सर्व शेजारीही आमच्यामध्ये सामील होत असत.
     गौरी आणायचा मान घरी आलेल्या माहेरवाशीणीचा असे. विहीरीतील पाणी हाताने काढता येइल इतकी विहीर तुडूंब भरलेली असायची. स्वच्छ धुउन विहीरी काठचे खडे तबकात ठेवले जात. त्यांची पुजा केली जाई. खास गौरींसाठी तिळाची फुले आणली जात. छानशी वेणी त्या तबकातील गौरींना घातली जाई. सर्व स्त्रीया विहीरीतील पाण्याने चुळ भरत व तसेच न बोलता गौरी वाजत गाजत घरापर्यंत आणल्या जात.
         घराच्या उंबरठ्यापाशी दूध, कोमट पाणी यांनी आई सर्वांचे पाय धुवत असे. यानंतर दिवा ओवाळून गौरींना घरात आणत. घरातील एका-एका खोलीत माहेरवाशीण गौरींना घेउन जाई. प्रत्येक खोलीत गेल्यावर आई विचारत असे ‘इथे इथे काय?’ आणि आम्ही सर्व जण जोरात ओरडायचो ‘उदंड’. शेणाने सारवलेल्या, मातीच्या भिंती असलेल्या सर्व खोल्या निरांजनाच्या प्रकाशात आईने ‘इथे इथे काय?’ विचारले की आमच्या ‘उदंड’ या उत्तराबरोबर आपोआप श्रीमंत होऊन जायच्या. सर्व घर आनंदित आणि तॄप्त व्हायचे.
        सर्व घर गौरी फीरवल्यानंतर त्या गणपती शेजारी स्थानापन्न केल्या जात. नंतर त्यांची विधीवत पुजा केली जाई. ते वातावरण उदंड उत्साहाचे असे. घरी कोणीतरी माहेरवाशीण आल्याचा भाव प्रत्येकीच्या चेहऱ्यावर गौरींची पुजा करताना असे. त्या दिवशी समईच्या शांत प्रकाशात गणपतीची मुर्तीही गौरींकडे पाहतेय असे वाटायचे.
       आताही गौरी येतात,आमच्याकडेही आणी शेजारीही सुंदर मुखवट्याच्या. पण आता कुटुंबे विभक्त झाली आहेत. आता माहेरवाशीणी फक्त भेटतात लग्न समारंभाना अन्यथा फोनवर.आता घरात विज आलेय.लहानपणी गणपतीला ६-७ किलोमीटर चालत जाणारे आम्ही सर्व आता आपापल्या सवडीने गाडी घेउन जातो, लगेच परत येण्यासाठी.
         सध्याच्या जिवघॆण्य़ा स्पर्धेच्या काळात, भौतिक सुखांच्या गर्दित जो तो आपापल्या कोपऱ्यात स्वताःच स्वताःला विचारतोय‘इथे इथे काय?’ पण मायेचा आणि तॄप्तीचा ‘उदंड’ खरच हाती येत असेल?